माढयाचा तिढा अजूनही कायम, राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम

0
1330

पंढरपूर (१५ मार्च) : राष्ट्रवादी काँग्रेसने आज  राज्यातील पाच लाेकसभा मतदार संघातील उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. मात्र या यादीतही माढ्याचा उमेदवाराचे नाव नसल्याने माढयाचा उमेदवार कोण याबाबतच सस्पेन्स कायम राहिला. याठिकाणी माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख की माजी खासदार रणजितसिंह मोहिते यांना उमेदनारी द्यायची यावर पक्षात जोरदार खल सुरु असल्याची माहिती आहे.

माढ्यातून राष्ट्रवादीचे नेते खसदार शरद पवार यांनी अनपेक्षितपणे माघार घेतल्यानंतर राष्ट्रवादीचा उमेदवार कोण याविषयी मतदार संघात चर्चा रंगू लागल्या आहेत. माढ्यातून निवडणूक लढवणार असल्याचे शरद पवारांनी स्वतःच जाहीर केल्यानंतर माढ्याच्या निवडणूकीकडे देशाचे लक्ष लागले होते. त्यानंतर पवारांनी निवडणूकीच्या दृष्टीने कार्यकर्त्यांचे मेळावे घेवून पक्षाची भूमिका स्पष्ट केली होती. दरम्यान ऐनवेळी पवारांनी आपण निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर करताच अनेकांचा हिरमोड झाला. त्यामुळे माढ्यातून राष्ट्रवादीचा उमेदवार कोण याचीच सर्वाना उत्सुकता लागून राहिली आहे. 

माढ्याच्या जागेसाठी सुरवातीपासून इच्छुक  असलेले माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुखांनीही यापूर्वीच मतदार संघात फिरुन अंदाज घेतला आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे खासदार विजयसिंह मोहिते पाटलांनी आपल्या ऐवजी पुत्र रणजितसिंहांना उमेदवारी द्यावी यासाठी आग्रह धरला आहे. परंतु पक्षातूनच रणजितसिंहांसाठी प्रतिसाद मिळत नसल्याने मोहिते पक्षावर नाराज असल्याचे चित्र आहे. याच नाराजीतून मध्यंतरी रणजितसिंहांनी भाजप नेते गिरीष महाजन यांची भेट घेतली होती. भेटीनंतर रणजितसिंह भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा देखील सुरु झाली होती. मात्र सध्यातरी रणजितसिंहांची भाजप प्रवेशाची चर्चा थांबली असून ते राष्ट्रवादीकडूनच लढतील असा अंदाज राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केला आहे.

दुसरीकडे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे हे देखील राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत. तरीही संजय शिंदे यांना उमेदवारी मिळेल का या विषयी साशंकता व्यक्त केली जात आहे.

या सर्व घडामोडीत राष्ट्रवादीचा उमेदवार कोण असेल ते पाहूनच भाजपचा उमेदवार ठरणार आहे. राष्ट्रवादीने प्रभाकर देशमुखांना उमेदवारी दिली तर सहकारमंत्री सुभाष देशमुख निवडणूकीच्या रिंगणात उतरतील, तर रणजितसिंह उमेदवार असतील तर भाजपला उमेदवारीसाठी शोधाशोध करावी लागणार आहे. 

राष्ट्रवादीने दुसरी यादी जाहीर केली. यामध्ये मावळच्या जागेवर अपेक्षेप्रमाणे पार्थ पवारांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. याच यादीत माढा मतदारसंघासाठी रणजितसिंह किंवा प्रभाकर देशमुख यांचे नाव जाहीर होईल असा अंदाज होता. परंतु या यादीत माढा मतदार संघाची उमेदवारीच जाहीर न झाल्याने इथल्या उमेदवारीचा तिढा कायम आहे. तर ही यादी प्रसिध्द झाल्यानंतर साहेब पुन्हा माढ्यासाठी उत्सुक आहेत की काय? असा प्रश्न राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पडला आहे. 

By mumbaienews.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here