बारामती (१५ मार्च) : सुजय विखे पाटील यांनी राष्ट्रवादीने देऊ केलेली उमेदवारी नाकारल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. राष्ट्रवादीचे तिकीट देऊन निवडून आणण्याची जबाबदारी अजित पवार म्हणून मी स्विकारायला तयार होतो, मात्र सुजय विखे यांनीच या प्रस्तावाला नकार दिला. पक्षांतर्गत गटबाजीचा फटका बसण्याची शक्यता गृहित धरून सुजयने हा निर्णय घेतल्याचेही त्यांनी सांगितले. 

सुजय याने राष्ट्रवादीच्या तिकीटावर लढावे असे त्यांना मी स्वतः सांगितले होते, पण त्यानेच या प्रस्तावाला नकार दिल्याने आमचाही नाईलाज झाला. सुजयला आता माझ्या समोर आणा, हे जर खोटं असेल तर जे म्हणाल ते करायची माझी तयारी असल्याचे पवार यांनी सांगितले. त्याचबरोबर सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की अजित पवार जे बोलतात ते खरचं बोलतात असेही त्यांनी स्पष्ट केले.

ज्येष्ठ नेते शरद पवार हे पन्नास वर्षे सक्रीय राजकारणात आहेत, त्यांनी माढ्यातून माघार घेतली कारण राज्यसभेची मुदत 2020 पर्यंत आहे. ती जागा विनाकारण इतरांना द्यावी लागली असती, त्या मुळेच त्यांनी हा निर्णय घेतला असावा, असेही पवार म्हणाले. हवेचा रोख बघून शरद पवारांनी माघार घेतल्याचा आरोप निव्वळ राजकीय हेतूने प्रेरित आहे. ज्यांच्या नावावर अनेक जण निवडून येतात, त्यांच्या बाबत असे विधान करणे चुकीचे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान माढ्याच्या जागेबाबत एका दिवसात अंतिम निर्णय होईल आणि सर्वांना मान्य होईल असाच उमेदवार तिथे दिला जाईल, असेही त्यांनी नमूद केले. 

पार्थ पवार यांच्या उमेदवारीबाबतही पवार यांनी आपली भूमिका मांडली. शेकापच्या ज्येष्ठ नेत्यांसह मावळ भागातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही पार्थ पवार यांच्या नावाचा आग्रह धरला होता. या सर्वांच्या भावनांचा आदर करुनच पार्थ पवार यांना उमेदवारी दिल्याचे अजित पवार यांनी सांगितले. सध्या राष्ट्रवादीला सर्वत्र अनुकूल वातावरण आहे, त्यामुळे या निवडणूकीत आघाडीला निश्चितपणे चांगल्या जागा मिळतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here