डहाणूतील 3 वर्षाच्या कोरोनाबाधित मुलीची प्रकृती स्थिर; 42 जण क्वारंटाईन..!

0
385

पालघर – योगेश चांदेकर:

पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील गंजाड या भागातील कोरोनाची लागण झालेल्या ३ वर्षीय मुलीची प्रकृती स्थिर असल्याची माहिती तालूका आरोग्य अधिकारी संदीप गाढेकर यांनी दिली आहे. तसेच त्या मुलीचे थुंकीचे नमुने (स्वॅब टेस्ट) दुसऱ्या चाचणीसाठी पाठवण्यात आले आहे. सदर मुलगी कोणत्याही कोरोनाबाधिताच्या थेट संपर्कात आलेली नसताना तिची कोरोना चाचणी पॉजिटीव्ह आल्याने एकच खळबळ माजली होती. दरम्यान तिच्या संपर्कात आलेल्या २९ लोकांना क्वारंटाईन करण्याचे काम सुरु आहे. इतर संपर्कात आलेल्या लोकांचा शोध सुरूच आहे.

डहाणू तालुक्यातील २४ जण क्वारंटाईन:
डहाणू तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय कासा येथील ८ जण (नर्सेस, इतर कर्मचारी) व उपजिल्हा रुग्णालय डहाणू येथील १६ (१ डॉक्टर व मुलीचे नातेवाईक) असे एकूण २४ जण कोरोनाबाधित मुलीच्या संपर्कात आले होते. या सर्वांचे विलगीकरण करण्यात आले आहे. दरम्यान काल रात्री उशिरा डहाणू तालुक्यातील गंजाड येथील दीवानपाडा, महालपाडा आणि दसरापाडा परिसर सील करण्यात आला आहे.

पालघर तालुक्यातील १८ जण आले होते बाधित मुलीच्या थेट संपर्कात:
पालघर तालुक्यातील काटाळे, मासवन या भागातील आशा वर्कर, नर्स व डॉक्टरसह १८ जण त्या मुलीच्या संपर्कात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर मनोर पोलिसांनी पालघर तालुक्यातील काटाळे, लोहरे, निहे मासवन, वांदिवली हि गावे रात्री उशिरा सील केली आहेत.

  • “३ वर्षीय कोरोनाबाधित मुलीची प्रकृती स्थिर असून योग्य ते उपचार सुरु आहेत. तसेच त्या मुलीचे थुंकीचे नमुने (स्वॅब टेस्ट) दुसऱ्या चाचणीसाठी पाठवण्यात आले आहे. लवकरच दुसरा चाचणी अहवाल मिळेल. मुलीच्या थेट संपर्कात आलेल्या लोकांची माहिती गोळा करण्याचे काम अद्याप सुरु आहे.” – संदीप गाढेकर, तालूका आरोग्य अधिकारी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here