पालघर: दमण बनावटीच्या दारूचा सुळसुळाट; बिअर दुकानावरच चढतेय झिंग..!

0
430

पालघर – योगेश चांदेकर:

दमण बनावटीच्या दारूचा पालघर जिल्ह्यात सर्वत्रच सुळसुळाट झाला असून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दुर्लक्षामुळे दमण बनावटीची ही दारू महाराष्ट्रात दररोज मोठ्या प्रमाणात येत आहे. गुजरातमधील दमण येथे स्वस्त मिळणाऱ्या दमण दारुचा फायदा पालघर जिल्ह्यामधील बनावट दारू विक्री करणाऱ्या टोळीने उचलला असून हा प्रकार उत्पादन शुक्ल विभागाच्या आशीर्वादाने होत असल्याची खमंग चर्चा देखील जिल्ह्यात रंगत आहे.

दमण बनावटीची व केंद्रशासित दादरा नगर हवेली या केंद्रशासित राज्यातून मोठ्या प्रमाणात बंदी असलेली दारू महाराष्ट्रात आणली जाते. तसेच जिल्ह्यातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात अवैध दारूची विक्री करण्यात येते. पण याकडे राज्य उत्पादन विभागाच्या अधिकाऱ्याचे अर्थपूर्ण दुर्लक्ष आहे, आशा अवैध दारूवर पोलीस कारवाई करतात. पण यासाठी शासनाने नेमलेला दारूबंदी विभाग मात्र याबाबत सुस्तच आहे. कोरोनाच्या लॉक डाऊन कालावधीमध्ये जिल्ह्यात काही ठिकाणी दारूसाठी लागणाऱ्या काळा गूळ व नवसागराचा मोठा साठा सापडला होता. पण त्यानंतर काही दिवसातच हाय अलर्टवरील विभाग सुस्त झाल्याने याकडे सर्वांचेच दुर्लक्ष होत आहे.

बिअर दुकानावरच चढतेय झिंग; सर्रास ‘चियर्स’चा गलका

बिअर शॉप ला फक्त पार्सल विक्री परवाना देण्यात आला असला तरी सध्या जिल्ह्यात अनेक ठिकाणी बिअर दुकानांमागेच तळीरामांच्या ‘चियर्स’चा गलका दिसून येत आहे. इतकंच नाही तर अनेक बिअर शॉप मधून बिनदिक्कत अवैध दारू विक्री सुरु आहे. लोकवस्तीच्या ठिकाणी असणाऱ्या बिअर दुकानांबाहेरच रंगणाऱ्या पार्ट्यांमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. याविरोधात बोलावं तरी दुकानमालकांची ‘वरपर्यंत’ पोहोच असल्याने लोक हा सर्व प्रकार उघड्या डोळ्यांनी पाहून गुमान सहन करत आहेत. त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देऊन कारवाई करण्याची गरज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here