पालघर : फरार आरोपी निलेश पाटीलला अटक, तपासाला मिळणार गती!

0
400

पालघर – योगेश चांदेकर:


रिलायन्स गॅस पाईपलाईन बाधित शेतकऱ्यांच्या लुबाडणुक प्रकरणातील मुख्य सूत्रधार व आरोपी निलेश पाटील राहणार बऱ्हाणपुर याला पालघर आर्थिक गुन्हे शाखेने रविवारी सापळा रचून अटक केली. निलेश पाटील हा गेल्या चार महिन्यांपासून फरार होता. त्याच्यासह इतर फरार आरोपींचा पोलीस कसुन शोध घेत होते. खबरींकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचत आरोपीला काल संध्याकाळी ७ वाजताच्या सुमारास किराट या गावातुन अटक केली. या अटकेमुळे घोटाळ्याच्या तपासाला गती मिळेल.

सविस्तर बातमी अशी कि रिलायन्स गॅस पाईपलाईन बाधित शेतकरी फसवणूक प्रकरणाचे वास्तव मुंबई ई न्यूजने समोर आणल्यानंतर जिल्ह्यात एकच खळबळ माजली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल होण्यासाठी शेतकऱ्यांचा दबावगट निर्माण झाल्याने अखेर पालघर पोलिसांनी गुन्हा नोंद करत याचा तपास पालघर आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवला. मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणात आत्तापर्यंत आरोपींची संख्या २० पेक्षा जास्त आहे. यातील मुख्य आरोपी निलेश पाटील हा फरार होता. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील पाठपुरावा केला होता. त्यानंतर या प्रकरणातील काही आरोपींना अटक करण्यात आली होती.

दरम्यान शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुंबई ई न्यूजचे पालघर विभागीय संपादक योगेश चांदेकर, सामाजिक कार्यकर्ते विजय वझे तसेच बाधित शेतकरी यांनी सोशल डिस्टंसिंग पाळतआमरण उपोषणाचे हत्यार उपसलं होतं. त्यांनतर उपोषणाच्या ८ व्या दिवशी जिल्हाधिकाऱ्यांनी तपास जलद करण्यासह इतर सर्व मागण्या मान्य केल्यानंतर उपोषण स्थगित केले होते.

पालघरचे पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, अप्पर पोलीस अधिक्षक प्रकाश गायकवाड तसेच आर्थिक गुन्हेशाखेचे पोलीस उप अधिक्षक शैलेश काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक उमेश पाटील, पोलीस हवालदार विनय मोरे, पोलीस कॉन्स्टेबल वाल्मिक पाटील सर्व (आर्थिक गुन्हे शाखा पालघर) यांनी मुख्य आरोपीला अटक करण्यात महत्वपूर्ण कामगिरी बजावली.

आरोपी निलेश पाटील याला अटक होणे गरजेचे होते. पोलिसांच्या कारवाईने तपासाला गती मिळेल तसेच शेतकऱ्यांना न्याय मिळेल. सर्व शेतकऱ्यांच्या वतीने मुंबई ई न्युजचे विशेष आभार. शेतकऱ्यांच्या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम करणे म्हणजे आजच्या घडीला पत्रकारिता जिवंत ठेवण्याचे काम करणे आहे. यापुढे देखील शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत पाठपुरावा करत राहू.

सामाजिक कार्यकर्ते – विजय वझे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here