पालघर: ..अन तो टायर नसलेल्या सायकलवरूनच निघाला दिल्लीला!

0
8545

पालघर – योगेश चांदेकर:

एखादा सामाजिक संदेश देण्यासाठी सायकल अथवा पायी शेकडो किलोमीटरचा प्रवास करणाऱ्या लोकांना आजवर आपण पाहिलं आहे. मात्र लॉकडाऊन मुळे शेकडो किलोमीटरचा प्रवास करत परराज्यातील कामगार आपल्या गावी जात असल्याचं दिसून आलं आहे. अशीच एक हृदयद्रावक घटना पालघर जिल्ह्यात वाडा तालुक्यातील कुडूस या गावात निदर्शनास आली. चक्क टायर नसलेल्या सायकलवरून एक युवक मनोरच्या दिशेने निघालेल्या काही ग्रामस्थांना दिसला असता. त्यावेळी त्याला आवाज देऊन त्याला विचारपूस केली असता तो दिल्ली येथील या आपल्या गावी जात असल्याचे त्याने सांगितले.

नवी मुंबई कोपर खैरणे येथून सोमवारी सकाळी ७ वाजता सायकलवरून तो युवक दिल्लीला जाण्यासाठी रवाना झाला होता. सकाळी ११ च्या सुमारास तो कुडूस येथून जात असताना त्याला थांबवून विचारपूस केली असता त्याने सर्व प्रकार सांगितला. नवी मुंबई येथील कपिल हेयर सलून येथे काम करणारा तो युवक सकाळी ७ वाजता अडगळीस पडलेली मित्राची सायकल घेऊन निघाला होता. दरम्यानच्या ८० किलोमीटरच्या प्रवासातच त्याच्या सायकलचे पुढचे टायर फुटले व प्रवासादरम्यान ते जीर्ण होऊन निघून पडले.

कोपर खैरणे ते दिल्ली हा १५०० किलोमीटरचा प्रवास सायकलवरून करण्यासाठी निघालेल्या त्या युवकाला कुडूस येथील कइस पटेल, रुकसाद शेख व स्वप्नील जाधव या युवकांनी थांबवले. उपाशीपोटीच निघालेल्या त्या युवकाला खाण्यापिण्यासाठी दिले. गावातीलच एका सायकल दुकानदाराकडून स्वखर्चाने ट्यूब व टायर बसवले. त्या युवकाला वस्तुस्थिती समजावून परत कोपर खैरणे येथे जाण्यासाठी सांगितले. जवळ एक छदाम देखील नसताना बाहेर पडलेल्या त्या वाटसरूला फक्त टायरच बसवून नाही दिले तर सोबत काही पैसेदेखील दिले.

माणुसकीच्या दर्शनाने भारावून गेलेला तो अवलिया भरल्या पोटाने सायकलच्या पॅडलवर पाय मारत पुढे दिल्लीला कि माघारी फिरून कोपर खैरणेला गेला तो मनोमन कुडूसच्या त्या दानशूरांना धन्यवाद देत असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here