पालघर: कोरोनामुक्तीचा काटाळे पॅटर्न; प्रभावी अंमलबजावणी आणि समन्वयाने हॉटस्पॉट ते कोरोनामुक्त..!

0
493

पालघर – योगेश चांदेकर:

पालघर तालुक्यातील काटाळे गावात पाच कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने गावाचा काँटेन्मेन्ट झोनमध्ये समावेश करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर काटाळे ग्रामपंचायतने तातडीने गावात नियंत्रण कक्षाची स्थापना केली होती. या नियंत्रण कक्षामधून नागरिकांना अत्यावश्यक सेवा मिळावी व परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याच्या दृष्टिकोनातून नियोजन करण्यात आले आहे. गंजाड दसरापाडा येथील पेशंट मिळाल्यानंतर १ महिना झाला गावात नवीन कोरोना रुग्ण मिळालेला नाही. त्यामुळे गाव सध्या कोरोनामुक्त झाले आहे असे म्हणण्यास हरकत नाही. या सर्व यशाचे श्रेय गेल्या महिन्याभरापासून अविरत काम करणाऱ्या कंट्रोल रूम, आरोग्य यंत्रणेलाच जाईल. त्यामुळे कोरोनामुक्तीचा ‘काटाळे पॅटर्न’ नक्कीच उल्लेखनीय आणि अनुकरणीय आहे.

एका पाठोपाठ एक असे ५ कोरोनाबाधित सापडल्यानंतर काटाळे गावासह संपूर्ण जिल्हा व आरोग्ययंत्रणा हादरून गेला होता. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी अगदी तातडीने खबरदारी म्हणून ग्रामपंचायती कडून संपूर्ण गावात निर्जंतुकीकरण करण्यात आले होते. प्रत्येक घरा घरात जाऊन मास्क आणि सॅनिटायझर, हँडवॉश वाटप करण्यात आले होते. गावातील नागरिकांना कुठल्याही अडचणी भेडसावू नयेत यासाठी नियंत्रण कक्षाची सुरुवात करण्यात आली. नियंत्रण कक्षाच्या माध्यमातूनच गावातील दुकानदारांना पालघरमधून जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून देण्यात येत आहेत. तसेच गावातील नागरिकांना त्या वस्तू योग्य दरात गावातच मिळत आहेत. यासाठी विशिष्ट वेळ नियमित करण्यात आली आहे. याशिवाय नियंत्रण कक्षातच बँकिंग व्यवस्थाही उपलब्ध करण्यात आली असल्याने नागरिक गावातच बँकेचे व्यवहार करत आहेत .

दूध आणि भाजीपाला विकणाऱ्या शेतकऱ्यांसाठी योग्य व्यवस्था करण्यात आली असून बाहेरील व्यापाऱ्यांना गावाच्या सीमेवर बोलवण्यात येत असून तिथून खरेदी-विक्रीचे व्यवहार होत आहेत. जीवनावश्यक वस्तू , गॅस सेवा, शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्याच काम ही नियंत्रण कक्षातून केले जात आहे. गावात दिवसातून दोन तास डॉक्टर उपलब्ध असून नागरिकांच्या आरोग्याची तपासणी गावातल्या गावातच केली जात आहे.

नियंत्रण कक्षाची जबाबदारी सरपंच दर्शना डुकले, ग्रामसेवक सतीश भागवत, तलाठी पीटर गमजा, पोलीस पाटील हर्षद पाटील, उपसरपंच हिमाली पाटील, अंगणवाडी सेविका आशा वर्कर यांच्यावर सोपवण्यात आली आहे. हॉटस्पॉट असताना ही अवसान गाळून न बसता गावकऱ्यांच्या एकजुटीने कोरोनाचा संसर्ग रोखण्यात कंट्रोल रूमने मोठी भूमिका बजावली आहे. त्यामुळेच गाव सध्या कोरोनामुक्त झाले आहे. या सर्व यशाचे श्रेय गेल्या महिन्याभरापासून अविरत काम करणाऱ्या कंट्रोल रूम, आरोग्य यंत्रणेलाच जाईल. त्यामुळे कोरोनामुक्तीचा ‘काटाळे पॅटर्न’ नक्कीच उल्लेखनीय आणि अनुकरणीय आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here