रेशनिंगचे नियम, माहिती आणि हक्क याविषयी सविस्तर जाणून घ्या, जे प्रत्येकाला माहित असलेच पाहिजेत!

0
4580

मुबंई। सध्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर बहुतांशी जीवनावश्यक वस्तू स्वस्त धान्य दुकानामध्ये उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न शासनाच्यावतीने सुरू आहेत. तसेच इतर वेळी देखील शासन जीवनावश्यक गोष्टींच्या पुरवठ्यासाठी स्वस्त धान्य दुकानालाच प्राधान्य देते. परंतु असे असले तरी नागरिकांना रेशन/स्वस्त धान्य(swast dhanya dukan/rashan dukan information) दुकानांबाबत त्यांच्या हक्कांविषयी बऱ्याचशा गोष्टी माहित नसतात. याचाच गैरफायदा घेत दुकानदारांकडून ग्राहकांची लुट केली जात असल्याच्या तक्रारी वाढत असल्याचे पहायला मिळते.

जाणून घ्या या गोष्टी – 
  • रॉकेल/घासलेट पहिल्‍या पंधरवड्यात न घेतल्‍यास महिना अखेरपर्यंत घेता येते. हप्‍ता बुडत नाही. 
  • बीपीएल व अंत्‍योदयचे धान्‍य गेल्‍या महिन्‍यात न घेतल्‍यास पुढच्‍या महिन्‍यातही घेता येते.
  • बीपीएल व अंत्‍योदयचे धान्‍य महिन्‍यात ४ हप्‍त्‍यातही घेता येते. 
  • रेशनवर घेतलेल्‍या वस्‍तूंची पावती मिळालीच पाहिजे. ती मागून घ्या. पावतीवर रेशन दुकानाचा क्रमांक असतो.
  • एका दिवशी एकच पावती फाडता येते असा नियम नाही. 
  • ज्‍या व जेवढ्या वस्‍तू हव्‍या असतील तेवढ्याच वस्‍तू आपण घेऊ शकतो. 
  • इतर वस्तू घेतल्‍याशिवाय रॉकेल मिळणार नाही असे दुकानदार म्‍हणू शकत नाही. 
  • रेशनकार्ड स्‍वतःकडे ठेवून घेण्‍याचा किंवा ते रद्द करण्‍याचा अधिकार दुकानदाराला नाही.
  • रेशन दुकान रोज सकाळी ४ तास व सायंकाळी ४ तास उघडे असलेच पाहिजे. 
  • आठवडी बाजाराच्‍या दिवशी उघडे असले पाहिजे. 
  • आठवड्यातून एकदाच दुकान बंद ठेवता येते. रेशन दुकान जर आठवड्यातून एक दिवसाहून अधिक दिवस बंद रहात असेल तर त्या बंद दुकानाची छायाचित्रे / चलचित्रे तारीख वेळे सहितhttp://mahafood.gov.in/pggrams या ऑनलाईन लिंकवर अपलोड करावीत. सिद्धता पडताळून दुकानदारावर तात्काळ कारवाई होते.
  • रेशन दुकानात लोकांना स्‍पष्‍टपणे वाचता येईल असा महिती फलक असला पाहिजे. या फलकावर दुकानाची वेळ, सुटीचा दिवस, दुकान क्रमांक, तक्रार वही उपलब्‍ध असल्‍याची नोंद, रेशन कार्यालयाचा पत्‍ता व फोन, रेशनकार्ड संख्‍या, भव व देय प्रमाण उपलब्‍ध कोटा ही माहिती असणे अनिवार्य असते. 
  • बीपीएल, अंत्‍योदय व अन्‍नपूर्णा लाभार्थ्‍यांची यादी दुकानात लावलेली असते.

वरीलपैकी कोणतीही गोष्‍ट आपल्‍या गावातल्‍या रेशनदुकानात होत नसेल, तर ताबडतोब लेखी तक्रार नोंदवा. जर गावातील रेशन दुकानदार धाक/धमकी दाखवत दांडगेशाही करून तक्रार करण्यास मज्जाव करत असेल तर त्रासलेल्या ग्राहकांनी गुप्तता राखून एकत्रितपणे लेखी अर्जावर आपली नावे आणि सही करून तो रजिस्टर पोस्टाने तहसिल कार्यालयाला पाठवा. तसेच दुकानातच तक्रार वही ठेवलेली असते. ती वही मागा आणि त्‍यात आपली तक्रार लिहून त्‍याखाली नाव, पत्‍ता, सही/अंगठा करा. जर दुकानदाराने ही वही दिली नाही, तर तहसिलदाराकडे वही न देण्‍याची तक्रार करा. तक्रारवही न देणे हा अदखलपात्र गुन्‍हा आहे, यावर तहसिलदार कारवाई करतात. तक्रारवहीत पाच तक्रारी नोंदल्‍या, की दुकानदाराला १५ हजार रूपये दंड होतो.

  • आपले रेशनकार्ड चेक (check your rashan info) करण्यासाठी खालील लिंक वर RC नंबर जो आपण रेशन घेताना बायोमेट्रीक साठी येतो तो नंबर टाकुन आपण आपली पावती प्राप्त करु शकतो. या साईटवर जाऊन आपल्या कार्डावर एका व्यक्तिमागे किती धान्य आपल्याला मिळण्याचा अधिकार आहे आणि दुकानदार किती देतो याची आपणास ऑनलाईन माहिती मिळते. https://mahaepos.gov.in/SRC_Trans_Int.jsp 
  • रेशन दुकानदारांचा FPS ID चेक करण्यासाठी खालील लिंक वर पहावे. किंवा आपल्या पावतीवर देखील आयडी असतो.https://mahaepos.gov.in/FPS_Trans_Abstract.jsp 
  • रेशन दुकानदारानी शासनाकडुन किती माल घेतला हे खालील लिंक वर पहावे https://mahaepos.gov.in/FPS_Status.jsp 
  • रेशन दुकानदाराविरुध्द तक्रार देण्यासाठी खालील लिंक वर पहावे.http://mahafood.gov.in/pggrams  वरील वेबसाईट या शासनाच्या अधिकृत वेबसाईट आहेत.

दुकानावर देखरेख करण्‍यासाठी ग्राम पंचायतीची दक्षता समिती असते. या समितीत जागरूक तरुणांनी सहभागी झाले पाहिजे. ग्रामसभेत या समितीविषयी चर्चा करा. गरज असेल, तर समिती बदला. ही समिती दुकानावर धाड घालू शकते. गैरप्रकार असतील, तर दुकानाला टाळेही लावू शकते. तलाठी या समितीचा सदस्‍य सचिव असतो.

आपण आपल्या गावात रेशन दुकानातुन रेशन घेतो. परंतु रेशन दुकानदार आपल्याला पावती मात्र देत नाही. म्हणुन महाराष्ट्र शासनाने लोकांना त्यांच्या पावत्या या ऑनलाईन देखील पाहता येण्यासाठी खालील वेबसाईट चालु केलेली आहे. आपण त्या वेबसाईटवर जाऊन आपला RC नंबर जो आपण रेशन घेताना बायोमेट्रीक साठी येतो तो नंबर टाकावा. महाराष्ट्र सरकारने जनतेस आवाहन केलेले आहे आपण खालील वेबसाईट वर जाऊन आपले रेशनकार्ड वरील धान्य चेक करावे.

जास्तीत जास्त लोकांना आपले रेशन कार्ड चेक करुन घ्यावे. व अशा रेशन दुकानदाराच्या (complaints about rashan dukan/swast dhanya dukan) तक्रारी सार्वजनिक वितरण तक्रार निवारण प्रणाली नि:शुल्क क्रमांक 1800-22-4950 व 1967 तसेच ई-मेल: helpline.mhpds@gov.in पाठवावा. असे आवाहन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग महाराष्ट्र शासनाकडुन करण्यात आलेले आहे. हा मेसेज जास्तीत जास्त लोकांना पर्यत पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here