पालघर: लॉक डाऊन ठरतोय जीवघेणा; रुग्णांना खांद्यावर घेऊन काढावा लागतोय मार्ग!

0
445

पालघर – योगेश चांदेकर:

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देश लॉक डाऊन आहे. यामुळे जगण्यासाठी अनेकांना जीव धोक्यात घालावा लागतोय याची अनेक उदाहरणे समोर येत आहेत. पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा या अतिदुर्गम असलेल्या ग्रामीण तालुक्यांतील लोकांना जिवंत राहण्यासाठी जीवघेणा संघर्ष करावा लागतोय. जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी, रुग्णांच्या दवापाण्यासाठी शहरामध्ये जाण्यास डोंगर दऱ्यातून पायपीट करावी लागत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा या ग्रामीण तालुक्यांतील काही गावे ही केंद्रशासित प्रदेश असलेल्या दादरा नगर हवेलीच्या हद्दीवर असल्याने लॉक डाऊनमुळे पूर्ण वाहतूक व्यवस्था बंद आहे. त्यामुळे येथील नागरिकांना जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी, रुग्णांच्या दवापाण्यासाठी शहरामध्ये जाण्यास डोंगर दऱ्यातून पायपीट करावी लागतेय. इतकेच नाही तर वृद्ध व आजारी असलेल्यांना चक्क खांद्यावर घेऊन यावं लागत आहे.

सीमाभागातील नागरिक व रुग्णांना तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी पर्यायी मार्ग म्हणून दाभेरी ते जांबुळमाथा आणि सागपाणा ते वावर असा रस्ता आहे. मात्र या रस्त्यावरून चार चाकी जाऊ शकत नाही तर मोटार सायकल तिघा जणांना ढकलत वर चढवावी लागते. उतरतांनाही ब्रेक लावत व मागे दोघांनी पडकून वावर सायवन रस्त्यावर निघावे लागते. प्रसंगी रुग्णांना खांदयावर बसवून डोंगर चढावा लागत आहे. लॉकडाऊन काळात आदिवासी रुग्णांना मोठ्या हालअपेष्टा सहन करत रुग्णालय गाठावे लागत आहे.    

जव्हार तालुक्यातील दाभेरी, कायरी, रुईघर, बोपदरी, जांबुळमाथा या ग्रामपंचायत गावातील १७ गाव पाडे आहेत. या ग्रामपंचयात हद्दीत जवळपास ५ हजाराच्या आसपास लोकसंख्या असून येथील नागरिकांना जव्हार तालुक्याच्या ठिकाणी येण्यासाठी दादरानगर हवेली या केंद्र शासित प्रदेश हट्टीपाडा (सीमा) या हद्दीवरून यावे लागते. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दादरा नगर हवेलीने हद्द (सीमा) बंद केली असून, साधे रुग्णांनाही ये-जा करण्यास बंदी असल्याने सीमा भागातील नागरिक व रुग्ण मोठ्या संकटात सापडले आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने दादरा नगर हवेली येथील संबंधित प्रशासनाकडे पाठपुरावा करून निदान रुग्णांसाठी तरी वाहतुकीस परवानगी द्यावी अशी मागणी या भागातील ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here