मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात सहकारातील विशेषतः दुग्ध व्यवसायातील अग्रगण्य असलेल्या गोकूळ म्हणजेच कोल्हापूर जिल्हा दुध उत्पादक संघाच्या निवडणुकीच्या प्रचाराला आता चांगलाच वेग आला आहे. या निवडणुकीत सत्ताधारी आणि विरोधकांनी परस्परांवर आरोपांची राळ उडवली आहे. या प्रचारात मुख्य मुद्दा आहे तो गोकुळच्या मल्टिस्टेटचा. विशेष म्हणजे निकालात निघालेला हा मुद्दा विरोधकांकडून का चर्चेला आणला जातो आहे, याचा आता मतदारांनाच प्रश्न पडला आहे.

गोकुळच्या निवडणुकीत विरोधक आघाडीकडून सत्ताधा-यांवर भ्रष्टाचारासह अन्य आरोप केले जातील, अशी मतदारांची अपेक्षा आहे आणि कोणत्याही निवडणुकीत पारंपरिकपणे याच धर्तीवर प्रचार केला जातो. मात्र, गोकुळच्या निवडणुकीत मल्टिस्टेट हा मुद्दाच मांडला जातो आहे. यामुळे विरोधकांकडे प्रचारासाठी दुसरे कोणतेही मुद्दे शिल्लक नसल्याचे बोलले जात आहे. त्यातही गोकुळला मल्टिस्टेटचा दर्जा मिळावा, अशी मागणी करणारा ठराव तत्कालिन संचालक विश्वास पाटील यांनी मांडला होता. तर त्याला विरोध अरुण डोंगळे यांनी केला होता. आज दोन्ही संचालक हे विरोधकांच्या आघाडीत आहेत. त्यामुळे मल्टिस्टेटचा मुद्दा कशाच्या आधारावर उपस्थित केला जातो आहे हा प्रश्न आहे.

विरोधक आणि सत्ताधारी दोघेही विकासाच्या मुद्द्यावर बोलताहेत. यात गोकुळची नेहमीच अमुलशी तुलना केली जाते. मात्र, अमूलच्या यशाचं गमक हे बहुराज्यीय झाल्यामुळं आहे. गोकुळचा विकास साधायचा असेल अधिक संकलन आणि विक्रीही मोठ्या प्रमाणात वाढ करायची असेल तर बहुराज्यीय केल्याशिवाय पर्याय नाही. म्हणजे एकीकडे म्हैशीने दुध तर दिले पाहिजे, अधिक सकस दिले पाहिजे अशी अपेक्षा करायची आणि दुसरीकडे तिला गोठ्याच्या बाहेर काढायची नाही किंवा गोठ्यातही खावू घालायचे नाही, असा विरोधकांच्या प्रचारातला विरोधभास दिसून येतो आहे. त्यामुळे संभ्रमित झालेला मतदार आता कुणाच्या चरवीत मतांचे दूध ओततो आहे यावरच सत्तेची फॅट लागणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here