‘राजा उधार झाला हाती भोपळा दिला..!’ पालघर जिल्ह्यातील ‘त्या’ शेतकऱ्याची व्यथा मुख्यमंत्र्यांना समजेल काय?

कृषी विभागाचे पंचनाम्याचे कागदी घोडे; सहा एकर भात पिकाला हजार रुपये नुकसान भरपाई..!

0
520

पालघर – योगेश चांदेकर:

नैसर्गिक आपत्तीमुळे हाता तोंडाशी आलेला घास हिरावून जाणे हे राज्यातील शेतकऱ्यांना नवे नाही. मात्र सध्या परतीच्या पावसाने जो कहर राज्याच्या काही भागांत माजवला आहे, त्याचीही अनुभूती बळीराजाच्या पाचवीला पुजलेली म्हणावी लागेल. रक्ताचं पाणी करत घाम गाळून पिकवलेली शेतातील धान्याची रास डोळ्यादेखत वाहून जाताना काय वेदना होतात, त्याची कल्पना अन्य लोकांना येणे शक्य नाही. केवळ सोयाबीन, तुरीच नव्हे तर भात, अद्रक, हळद या पिकांनाही अतिवृष्टीचा फटका बसला आहे. राज्य सरकारने पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत मात्र उंटावरून शेळ्या हाकणाऱ्या कृषी विभागामुळे शेतकऱ्यांच्या पदरात सरकारची मदत पडेल का? या प्रकाराची कृषिमंत्री दखल घेतील का? याच उत्तर लवकरच मिळेल मात्र संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला अकार्यक्षम व कामचुकार अधिकाऱ्यांमुळे मुकावे लागू नये यासाठी सर्वांनी जागरूक असणे गरजेचे आहे.

२०१९ मध्ये क्यार व महा या चक्रीवादळांमुळे ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात कोसळलेल्या अवेळी पावसामुळे ठाणे व पालघर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांची १०० टक्के शेती नष्ट होऊन कोट्यवधींचे नुकसान झाले होते. तत्कालीन दीड दिवस सत्तेत असणाऱ्या फडणवीस सरकारने ओल्या दुष्काळाच्या संकटात अडकलेल्या शेतकऱ्यांना मदतीची घोषणा केली, मात्र सरकार कोसळले अन नवा गडी नवे राज्य अशी अवस्था झाली. त्यानंतर सत्तेत आलेल्या ठाकरे सरकारच्या आदेशावरून दोन्ही जिल्ह्यांच्या प्रशासनाने शेतपिकांच्या नुकसानीचे युद्धपातळीवर पंचनामे करून आपले अहवाल राज्य शासनाकडे पाठविले. मात्र हे पंचनामे एवढे बोगस होते याची पोलखोलच मुंबई ई न्युज कडे आलेल्या माहितीवरून होते आहे.

सविस्तर बातमी अशी कि, पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील चिंचणी गावात सहा एकर भात शेती असणाऱ्या राहुल चुरी यांच्या खात्यात १००० रुपये नुकसान भरपाई जमा करत कृषी विभागाने एकप्रकारे त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचेच काम केले आहे. राहुल चुरी यांनी ०९ ऑक्टोबर रोजी तालुका कृषी अधिकारी, डहाणू यांना पत्र लिहित आपल्या नुकसानग्रस्त भातशेतीची पाहणी करण्याची विनंती केली होती. मात्र या भागात कार्यरत कृषी सहाय्यकाने प्रत्यक्ष भेट देऊन अहवाल देण्याऐवजी बोगस अहवाल पाठवला. चुरी यांना नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीच्या यादीत आपले नाव व मिळालेली १००० रुपये मदत पाहून धक्काच बसला. त्यांनी सदर प्रकार तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देत याबद्दल खंत व्यक्त केली. स्वतः वाणिज्य शाखेचा पदवीधर असलेल्या शेतकऱ्याची जर हि अवस्था असेल तर इतर अशिक्षित व अल्पशिक्षित शेतकऱ्यांचा विचार देखील करू शकत नाही.

‘हाच तो चेक’ जो कृषी विभागाच्या अब्रूचे धिंडवडे काढतोय..!

राहुल चुरी यांनी जिल्हा कृषी अधीक्षक यांना पत्र लिहित आपले नाव लाभार्थ्यांच्या यादीतून वगळण्याची विनंती केली, मात्र यादीतून नाव वगळणे शक्य नसल्याचे कळविण्यात आले. त्यामुळे नुकसान भरपाई पोटी मिळालेली एक हजार रुपये हि रक्कम थेट ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधीस’ दान करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. एवढंच नाही तर कृषी विभाग जर मदतीच्या नावाखाली अशी थट्टाच करणार असेल तर यापुढे आपला अशाप्रकारच्या कोणत्याही लाभार्थ्याच्या यादीत समावेश करू नये अशी विनंती देखील त्यांनी पत्राद्वारे केली आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा होणारी हि रक्कम शेतकऱ्याला नडणाऱ्या व्यवस्थेची लख्तरे आहेत, किमान यानंतर तरी मुख्यमंत्री, कृषिमंत्री याकडे लक्ष देतील एवढी भाबडी आशा या शेतकऱ्याला आहे.

‘आमची चूक झाली…’ अन बळीराजाचा प्रामाणिकपणा..!

चुरी यांनी यावर्षी देखील भाताचे पिक घेतले आहे. अवकाळी पावसाने संपूर्ण पिक अगदी भुईसपाट झालेलं असताना त्यांनी मुंबई ई न्यूजचे पालघर विभागीय संपादक योगेश चांदेकर यांना संपर्क साधत नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे होत नसल्याचे सांगितले. त्यानंतर चांदेकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना याविषयी विचारले असता त्यांनी तातडीने पंचनामा करण्यासाठी धाव घेतली. गत वर्षीच्या नुकसान भरपाई विषयी पाढा वाचताच उपस्थित अधिकाऱ्यांनी ‘गेल्यावर्षी आमची चूक झाली. यावर्षी जास्त नुकसान भरपाई मिळवून देतो’ असे सांगितले. मात्र संकटात असताना देखील बळीराजाने त्यांना नकार देत ‘यावर्षी जेवढ नुकसान झालंय तेवढीच मदत द्या’ असं म्हणत आपला स्वाभिमान दाखवला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here