पालघर – योगेश चांदेकर:

कोरोनाच्या लढाईत ज्या शस्त्राला अनन्यसाधारण महत्व आहे ते N 95- 3 D मास्क म्हणजे सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांची ढालच म्हणा. N 95- 3 D मास्क नसल्याने अनेक जनरल प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांनी व खासगी पॅथॉलॉजी टेक्निशियन्सनी कोरोना संसर्ग होण्याच्या भीतीमुळे सेवा देणे बंद केले होते. याला पालघर जिल्ह्यातील डॉक्टर व पॅथॉलॉजिस्ट अपवाद नव्हते. नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी पालघरमधील डॉक्टर व खासगी पॅथॉलॉजी कर्मचाऱ्यांसाठी एकूण पाचशे N 95- 3 D मास्क पाठवले आहेत त्यामुळे त्यांची मोठी अडचण दूर झाली आहे.

चार दिवसांपूर्वीच राज्यसरकारने वैद्यकीय सेवा बंद ठेवल्यास कारवाईचे आदेश देत अशा डॉक्टरांचे परवाने रद्द करण्याचा आदेश दिला होता. यामुळे पेचात पडलेल्या डॉक्टर व पॅथॉलॉजिस्ट यांची ना. एकनाथ शिंदे यांनी सोडवणूक केली. याबाबतची माहिती डॉ उज्ज्वला काळे, नगराध्यक्ष पालघर नगरपरिषद यांनी ना. एकनाथ शिंदे याना दिली होती. यानंतर तात्काळ ना. एकनाथ शिंदे यांनी पालघरमधील डॉक्टर व खासगी पॅथॉलॉजी कर्मचाऱ्यांसाठी एकूण पाचशे N 95- 3 D मास्क पाठवून दिले. यामुळे डॉक्टरांनी ना. एकनाथ शिंदे यांचे आभार मानत पुन्हा एकदा जोमाने आपली वैद्यकीय सेवा देण्यास सुरुवात केली आहे.

वैद्यकीय सेवा देणे हे आमचे प्रथम कर्तव्य आहे मात्र आम्हालाच संक्रमण झाले तर मोठा अनर्थ घडू शकतो. अगदी समूह संसर्ग देखील होऊ शकतो या काळजीपोटीच आम्ही सेवा देण्यास घाबरत होतो. मात्र मंत्री महोदयांनी आम्हाला मोठा आधार दिला या शब्दात डॉक्टरांनी व पॅथॉलॉजी कर्मचाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. एक आरोग्य कर्मचारी कोरोना बाधित झाल्यास त्याच्या संपर्कात येणाऱ्या शेकडो लोकांना संक्रमण होऊ शकते. म्हणूनच जनरल प्रॅक्टिस करणाऱ्या या डॉक्टरांना व पॅथॉलॉजी कर्मचाऱ्यांना N 95- 3 D मास्क मिळणे महत्त्वाचे होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here