पालघर – डहाणू पंचायत समितीचा अजब कारभार; शिपाई वापरतोय साहेबाच घरदार..!

0
409

पालघर – योगेश चांदेकर

शासनाकडून शासकीय कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी कामाच्या श्रेणीनुसार घर उपलब्ध करून दिले जाते . एखाद्या कर्मचाऱ्यास देण्यासाठी शासकीय घर शिल्लक नसेल तर त्यांस घरभाडे देण्यासाठी पगारासोबत अतिरिक्त रक्कम देण्यात येते. हि रक्कम कर्मचाऱ्याच्या श्रेणीनुसार वेगवेगळी असते. डहाणू पंचायत समिती मध्ये घरांचा ताबा देत असताना चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यावर जास्तीची मेहेरबानी दाखवली जात असल्याचे उघडकीस आले आहे. एका चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यास चक्क तृतीय श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी आरक्षित घराचा ताबा देण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती घेतली असता असे दिसून आले कि त्या कर्मचाऱ्याला मागील वर्षभरापासून या घराचा ताबा देण्यात आला आहे. कनिष्ठ श्रेणी कर्मचाऱ्याला मंजुरी पेक्षा अधिकचे सुविधा असणारे घर दिल्यास त्याच्याकडून अधिकचा भार वसूल करणे गरजेचे असते. अशाप्रकारे त्याच्याकडून रक्कम शासकीय तिजोरीत जमा केली जात आहे का? सदर कर्मचाऱ्यास त्या घराचा ताबा दिल्याने मागणी असलेल्या एखाद्या तृतीय श्रेणी कर्मचाऱ्याला बाहेर भाड्याने घर घेऊन तर रहावे लागत नाही ना? एखाद्या कर्मचाऱ्यावर एवढी मेहरबानी का दाखवली जाते आहे? जिल्ह्यातील इतर शासकीय निवासी संकुलांमध्ये अशाप्रकारची अनियमितता आहे का असे एक ना अनेक प्रश्न यामुळे उपस्थित होत आहेत.

पिंटू गहला उपसभापती पंचायत समिती डहाणू यांनी याबात चौकशीची मागणी केली असून या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त करत हा शासनाचा पैसे वाया घालवण्याचा प्रकार आहे असं मुंबई ई न्यूजशी बोलताना सांगितले. याबाबत खुलासा विचारला असता बाबासाहेब भरक्षे गट विकास अधिकारी डहाणू यांनी “सदर कर्मचारी राहत असलेल्या घराचा स्लॅब कोसळल्याने त्याला तात्पुरत्या स्वरूपात या घराचा ताबा दिला होता. तृतीय श्रेणी कर्मचाऱ्याकडून घराची मागणी झाल्यास त्यांना हे घर उपलब्ध करून दिले जाईल” असे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here