पालघर: टोळधाडीच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना ‘या’ सूचना..!

0
524

पालघर – योगेश चांदेकर:

पालघर: टोळांचे मोठे थवे गुजरातच्या काही भागात पोहचल्यामुळे पालघर जिल्हा प्रशासनाने राज्याच्या किनारी असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. गुजरात सीमेजवळील तलासरी, जवाहर आणि डहाणू येथील शेतकर्‍यांना गट तयार करून त्यांच्या शेतात रात्री जागता पहारा ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. टोळ विश्रांतीसाठी संध्याकाळी 7 ते रात्री 9 या वेळात शेतात शिरतात असंही सांगण्यात आले आहे. टोळांना एखाद्या विशिष्ट भागात पोहोचण्यापासून रोखण्यासाठी टायर जाळणे, टायरचा धूर करणे हे काही उपाय अवलंबण्याचे कृषी विभागाने आवाहन केले आहे. टोळधाडीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास संबंधित कृषि सहाय्यक व तालुका कृषि अधिकारी तसेच कृषि विदयापीठ/कृषि विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञांशी संपर्क साधावा असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी काशिनाथ तरकसे यांनी आवाहन केले आहे.

टोळधाडीच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी कृषी विभागाने प्रत्येक गावातील शेतकऱ्यांचे व्हाट्सअप ग्रुप बनवले असून एखाद्या गावात टोळ धाड आल्यास त्याबाबत तात्काळ माहिती मिळण्यास मदत होणार आहे. एखाद्या ठिकाणी टोळधाड आल्यास त्यावर फवारा करण्यासाठी अग्निशामक दलाच्या गाड्यांची मदत घेण्याचे जिल्हाप्रशासनाने नियोजन केले आहे. सोबतच कृषी विभागामार्फत प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालय येथे सूचनाफलक लावण्याचे नियोजन केले आहे. याबाबत कृषी विभागाने शेतकऱ्यांनी घ्यावयाच्या खबरदारीच्या उपाययोजना बाबत सूचना केल्या आहेत.

शेतकऱ्यांनी घ्यावयाच्या खबरदारीच्या उपाययोजना:

• शेतकऱ्यांचे गट बनवून रात्री शेतात देखरेख व पाहाणी करावी. संध्याकाळी 7 ते 9 या कालावधीत हे किटक लाखोंच्या संख्यने विश्रांतीसाठी शेतात उतरू शकतात.
• शेताच्या आजूबाजूला मोठे चर खोदणे, तसेच वाद्य वाजवून मोठ्याने आवाज करावा.
• संध्याकाळी/ रात्रीच्या वेळी झाडा-झुडपांवर टोळ जमा होतात अशावेळी प्रादुर्भावग्रस्त शेतामध्ये मशाली पेटवून तसेच टायर जाळून धूर केल्यास नियंत्रण होते.
• प्रतिबाधात्मक उपाय म्हणून निंबोळी आधारीत किटकनाशक आझाडिरेक्टीन 1500 पिपिएम 30 मि.ली. किंवा 5 मिली निंबोळी अर्काची प्रती 10 लि. पाण्यात मिसळून फवारणी करावी.
• आमिषाचा वापर 20 किलो गहू किंवा भाताच्या तूसामध्ये फिप्रोनिल 5 एससी, 3 मि.ली. मिसळावे व त्याचे ढिग शेतात ठेवावे. याकडे टोळ आकर्षित होतात व सदर आमिषामूळे हि किड मरण पावते.
• टोळांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळून आल्यास क्लोरपायरीफॉस 20 ईसी 24 मि.ली किंवा क्लोरपायरीफॉस 50 ईसी 10 मि.ली किंवा डेल्टा मिथ्रिन 2.8 ईसी 10 मि. ली किंवा फिप्रोनील 5 एससी 2.5 मि. ली किंवा ल्यांब्डा सायहेलोथ्रिल 5 ईसी 10 मि. ली किंवा मॅल्याथिऑन 50 ईसी 37 मि. ली प्रती 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
• फवारणी शक्यतोवर रात्री उशिरा किंवा पहाटेच्या वेळी करावी. अशावेळी टोळ विश्रांतीसाठी मोठ्या संख्येने झाडाझुडपावर जमा झालेले असतात. त्यावर फवारणी केल्यास बऱ्याच प्रमाणात नियंत्रण मिळणे शक्य होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here