Mumbai E News Network : चक्रीवादळाचा राज्यावर जाणवणारा परिणाम आता कमी झाला आहे. चक्रीवादळाच्या प्रभावामुळे राज्यात नऊ जणांचा मृत्यू झाला असून २१ पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. किनारपट्टीवरच्या वीजयंत्रणेची वादळामुळे प्रचंड हानी झाली असून महावितरणचे कर्मचारी दुरुस्तीची कामे अविश्रांत करीत आहेत, अशी माहिती ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली.

रुग्णालयांसह ऑक्सिजन प्रकल्प, विलगीकरण कक्ष, लसीकरण केंद्रे, पाणीपुरवठा, आदींचा वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्राधान्याने दुरुस्तीकामे हाती घेतली आहेत, असे त्यांनी सांगितले. चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुमारे ५ कोटी ७७ लाख रुपयांचे नुकसान झालं असल्याची प्राथमिक माहिती आहे. देवगड इथल्या बोट दुर्घटनेत तिघे जण बचावले असून दोघांचा मृत्यू झाला. अद्याप दोन जण बेपत्ता आहेत. 

रत्नागिरी  जिल्ह्यात पंचनाम्याचे काम सुरू झालं आहे. जिल्ह्यात एकूण १ हजार १८९ मिमी पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात १ हजार २८ घरांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.  रायगड जिल्ह्यात ५ हजार २५३ घरांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. झाड आणि भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनांमध्ये जिल्ह्यात चार जणांचा मृत्यू झाला असून ६ जण जखमी झाले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली. चक्रीवादळामुळे ठाणे जिल्ह्यात तीन जणांचा मृत्यू झाला असून ५  जण जखमी झाले आहेत. चक्रीवादळामुळे बाँम्बे हाय परिसरात बार्जवर अडकलेल्या  १७७ जणांची सुटका करण्यात बचाव पथकांना यश मिळालं.

मुंबईत ५६ ठिकाणी पाणी तुंबण्याच्या घटना घडल्या. ४६ ठिकाणी घरांचा भाग कोसळून झालेल्या दुर्घटनांमध्ये ९ जण जखमी झाले. २ हजार ३६४ ठिकाणी झाडं किंवा फांद्या पडण्याच्या घटना घडल्या. मढ आणि माहीम इथे बोटी फुटून दोन जण बेपत्ता झाले. यावेळी १० जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं. वांद्रे कुर्ला संकुलातलं जम्बो कोविड केंद्र सुखरूप असल्याचं बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने कळवले आहे. 

चक्रीवादळाने झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी  केंद्रीय पथक राज्यात पाठवावे, यासाठी केंद्र शासनाला पत्र लिहिल्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. चक्रीवादळामुळे उद्ध्वस्त झालेल्या कोकणातल्या शेतकऱ्याला बांधावर जाऊन तातडीने मदत करावी अशी मागणी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here