…तोट्यात चालणाऱ्या ‘राज्य बँकेने’ मिळवला १०९ वर्षांतील उच्चांकी नफा..!

0
483

मुंबई । मार्च २०१९-२०२० या संपलेल्या आर्थिक वर्षात राज्य बँकेने गेल्या 109 वर्षांतील अनेक विक्रम मोडले आहेत. राज्य सहकारी बॅंकेने विक्रमी कामगिरी केली असून बॅंकेला एक हजार 345 कोटींचा ढोबळ नफा झाला असून 325 कोटींचा निव्वळ नफा झाल्याचे प्रशासक मंडळाचे अध्यक्ष विद्याधऱ अनास्कर यांनी सांगितले. इतकेच नाही तर बँकेला नेट एनपीए शून्यावर आणण्यात यश आले आहे.

राज्य बँकेची आर्थिक स्थिती खालावल्यामुळे रिझर्व्ह बॅंकेने 7 मे 2011 रोजी राज्य सहकारी बॅंकेचे संचालक मंडळ बरखास्त करुन प्रशासकाची नियुक्‍ती केली. त्या संचालक मंडळात अजित पवार होते. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ते संचालक मंडळ रिझर्व्ह बॅंकेच्या साह्याने बरखास्त केले होते. त्यावेळी बॅंकेला 1069 कोटींचा तोटा होता. त्यातून मार्गक्रमण करीत बॅंक आता आर्थिकदृष्ट्या सक्षम झाली आहे.

बॅंक सक्षम झाल्यामुळे अडचणीतील सहकारी बॅंका विलीन करून घेण्यासाठीचा मार्ग खुला होणार असून पुण्यातील रूपी सहकारी बॅंकेचे राज्य बॅंकेत विलीनकरण करण्याचा प्रस्ताव रिझर्व्ह बॅंकेकडे प्रलंबित आहे. त्यावर येत्या काही दिवसांत निर्णय होणे अपेक्षित आहे. तसेच इतर सहकारी बॅंकांना मदत करण्यासाठी राज्य बॅंकेने आता रिटेल व्यवसायात उतरण्याची तयारी देखील सुरु केली आहे.

आरबीआयच्या निकषांपेक्षा बॅंकेचे भांडवल 13.11 टक्‍क्‍यांनी अधिक झाले आहे. प्रति कर्मचारी व्यवसाय 2018 च्या तुलनेत वाढला असून तो आता 43 कोटींवर पोहचला आहे. बॅंकेचे सभासद, कर्मचाऱ्यांच्या विश्‍वासामुळे व परिश्रमामुळे बॅंकेला मोठे यश प्राप्त झाल्याचे अनास्कर यांनी सांगितले. बॅंकेने 109 वर्षांत प्रथमच मोठे यश मिळवल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. बॅंकेने आपले कार्यक्षेत्र कारखान्यापुरतेच मर्यादित न ठेवता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंका, पतसंस्था, हौसिंग सोसायट्यांसह अन्य सहकारी संस्थांना कर्जपुरवठा केला. त्या सर्व कर्जदारांनी कर्जाची नियमित परतफेड केल्याने बॅंक आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्याचे बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ए. आर. देशमुख यांनी सांगितले.

  • “पुणे येथील रुपी को. ऑप. व मुंबई स्थित सिटी को. ऑप. बँकेच्या विलिनीकरणाच्या प्रस्तावावर रिझर्व्ह बँकेचा निर्णय येताच, सध्याच्या शेती व शेती पूरक व्यवसाया बरोबरच रिटेल बँकिंग क्षेत्रात उतरण्याचा राज्य बँकेचा विचार असून, त्याद्वारे व्यवसाय वाढीबरोबरच व्यावसायिक धोका कमी करण्याचा उद्देश आहे. राज्य बँकेने 109 वर्षातील गाठलेले अनेक उच्चांक हे सर्व सभासद, खातेदार, हितचिंतक तसेच बँकेचा संपूर्ण सेवक वर्ग यांच्यामुळे साध्य झाले असल्याने, मी या सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. ” – विद्याधऱ अनास्कर, अध्यक्ष (प्रशासक मंडळ)

१०९ वर्षांतील उच्चांक गाठणारी कामगिरी…

  • बॅंकेचा एनपीए शून्य; 109 कोटींच्या इतिहासात बॅंकेचे मोठे यश
  • अनुत्पादित कर्जासाठी 100 टक्‍के तरतूद केल्याने अनुत्पादित कर्जाचे निव्वळ प्रमाण शून्यावर
  • 31 मार्च 2020 अखेर राज्य सहकारी बॅंकेला एक हजार 345 कोटींचा ढोबळ नफा
  • ऑपरेटिंग प्रॉफीट 758 कोटी तर विविध तरतुदीनंतर झाला सव्वातीनशे कोटींचा नफा
  • सात वर्षांपासून बॅंक ‘अ’ वर्गात; सहा वर्षांपासून दिला जातोय सभासदांना 10 टक्‍के लाभांश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here