पालघर: तारापूर एमआयडीसीतील त्या कंपन्यांच्या ‘कन्सेन्ट टू ऑपरेट’चं गौडबंगाल काय?

0
492

पालघर – योगेश चांदेकर:

पालघर जिल्ह्यातील तारापूर एमआयडीसी मधील कंपन्यांमध्ये अनेकवेळा गूढ अपघाती स्फोट होण्याच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये अनेकजणांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे. आजवर शेकडो कामगार गंभीर जखमी झाले आहेत. अशावेळी केमिकल कंपन्यांना परवानगी देणाऱ्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी न करताच ‘कन्सेंट टू ऑपरेट’चे प्रमाणपत्र दिले असल्याची धक्कादायक माहिती मुंबई ई न्यूजला मिळाली आहे.

केमिकल कंपनीमध्ये उत्पादन सुरु करण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळाची परवानगी घेणे आवश्यक असते. सदर परवानगी देत असताना संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी न करताच एका राजकीय नेत्याच्या केमिकल कंपनीला २०१७ मध्ये कंपनीमध्ये ‘कन्सेंट टू ऑपरेट’चे प्रमाणपत्र दिलं गेले आहे. मुंबई ई न्यूजचे पालघर विभागीय संपादक योगेश चांदेकर यांनी संबंधित गोष्टीची शहानिशा करण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी होळकर यांना याबाबतची माहिती दिली. केमिकल कंपनीमध्ये उत्पादनासाठी सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक चिमणी, बॉयलर, रिऍक्टर, चिलिंग हब, कॉलम या गोष्टी अस्तित्वात नसल्याची माहिती मुंबई ई न्यूजकडे आल्याचे चांदेकर यांनी होळकर यांना सांगितले. कंपनीमध्ये प्रत्यक्ष पाहणी कधी केली आहे असे विचारले असता त्यांनी २०१९ मध्ये आलो असता गेट बंद होते असे सांगितले. तसेच दुसऱ्या दिवशी अथवा इतर कधी पाहणी का केली नाही असे विचारताच त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.

दरम्यान कंपनी प्रशासनाकडून कधी वाढीव उत्पादन क्षमतेसाठी कन्सेंट टू इस्टॅब्लिशमेंट साठी तर कधी कन्सेंट तू ऑपरेटच्या नूतनीकरणासाठी परवानगी मागितल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे. त्यामुळे २०१९ पासून प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी पुन्हा पाहणी केली नसेल तर अशा कंपन्यांची सुरक्षितता हि राम भरोसे आहे असेच म्हणावे लागेल. एवढंच नाही तर अशा कंपनीमध्ये जर उत्पादन होत नसेल तर त्यांनी परवानगी कोणत्या उद्देशाने घेतली आहे? तसेच उत्पादन होत नसेल तर याठिकाणी नेमके काय काम चालते? कोणत्या प्रकारच्या मालाची ने-आण होत असते? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. सदर कंपनीचे खरेदी विक्री व्यवहार तपासल्यास या गोष्टींची उकल होऊ शकते. त्यामुळे प्रशासनाने याची तात्काळ दखल घेत सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here