पालघर: मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या ‘त्या’ आदेशाला डहाणू गट विकास अधिकाऱ्यांकडून ठेंगा..!

0
572

पालघर – योगेश चांदेकर:

पालघर जिल्ह्यातील शिक्षक हे नियुक्तीच्या ठिकाणी काम न करता जिल्ह्याच्या कामासाठी कार्यरत असल्याचे धक्कादायक वास्तव ‘मुंबई ई न्यूज’ने उघडकीस आणताच खळबळ उडाली होती. संबधित बातमीची गंभीरतेने दखल घेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र वारभुवन यांनी या प्रकरणाची चौकशी सुरु करून ‘त्या’ शिक्षकांना नियुक्तीच्या ठिकाणी तात्काळ हजर राहण्याचे आदेश दिले.

दरम्यान बहुतांश शिक्षक नियुक्तीच्या ठिकाणी हजर राहिले असे असले तरी शिक्षक दिनकर कदम हे डहाणू पंचायत समिती येथेच कार्यरत आहेत. डहाणू गटविकास अधिकारी बाबाराव भरक्षे आणि गटशिक्षण अधिकारी बाबूराव राठोड यांचा वरदहस्त असल्यानेच शिक्षक दिनकर कदम हे तालुक्याच्या ठिकाणीच कार्यरत आहेत असे समजते. तसेच दिनकर कदम हे गेल्या ६ वर्षांपासून नियुक्तीच्या ठिकाणी जात नसल्याची माहिती काही पालकांनी दिली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या झालेल्या शैक्षणिक नुकसानीस कदम हे जबाबदार असून त्यांनी त्वरित नियुक्तीच्या ठिकाणी(शाळा गोवरशेत, केंद्र दापचरी) हजर रहावे अशी मागणी पालक वर्गातून होत आहे.

शिक्षण विभागातील अनागोंदी कारभार सुरु असल्याच्या बातमी नंतर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष घालत शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना शिक्षकांना नियुक्तीच्या ठिकाणी पाठवण्यात यावे असे आदेश दिले होते. त्यानुसार अनेक शिक्षक आपल्या नियुक्तीच्या ठिकाणी हजर देखील झाले आहेत. मात्र काही शिक्षक वरिष्ठांच्या वरदहस्ताने आजही नियुक्तीच्या ठिकाणी हजर होत नाहीत. या सर्व प्रकारात शिक्षकांना अभय देणाऱ्या तालुकास्तरावरील अधिकाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशाला हलक्यात घेतले असल्याच्या चर्चा शिक्षकांमध्ये रंगत आहेत. शिक्षकांना अभय देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला तर आणि तरच भविष्यात अशा घटनांना आळा बसेल. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा आदेश डावलणाऱ्या अधिकाऱ्यांवर काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here