शिवसेनाप्रमूख बाळासाहेब ठाकरेंच्या भूमिकेशी प्रतारणा करणारा निर्णय घेऊ नये

रामदास आठवलेंचे उद्धव ठाकरेंना आवाहन

विशेष प्रतिनिधि-योगेश चांदेकर

मुंबई – सत्ता स्थापनेसाठी शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत बोलणी करीत असल्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. जर शिवसेनेने काँग्रेस राष्ट्रवादीसोबत एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्याचा मार्ग निवडला तर तो मार्ग शिवसेनेच्या प्रतिमेसाठी घातक ठरू शकतो. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काँग्रेसविरोधी भूमिकेशी प्रतारणा करणारा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेऊ नये असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केले. बांद्रा पूर्वेतील संविधान निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ना. रामदास आठवलेंनी आपली भुमीका स्पष्ट केली.

भाजप शिवसेनेची नैसर्गिक युती असून या युतीला जनतेने दिलेला स्पष्ट बहुमताचा जनादेश शिवसेनेने डावलू नये. भाजप सोबत वाद मिटवून तडजोड करून एकत्र सरकार स्थापन करावे. काँग्रेस आघाडीसोबत शिवसेना सरकार जरूर स्थापन करू शकते मात्र ते सरकार अल्पावधीत कोसळू शकते आणि महाराष्ट्राला पुन्हा निवडणुकीला सामोरे जावे लागेल. त्यामुळे शिवसेनेने महाराष्ट्राच्या हितासाठी भाजप सोबत सरकार स्थापन करावे ;काँग्रेस आघाडी सोबत जाऊन आत्मघात करू नये असा सल्ला ना. रामदास आठवले यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिला.

जर राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडीसोबत एकत्र येण्याचा शिवसेनेचा प्रयोग असेल तर आपण लवकरच शरद पवार यांची भेट घेऊ. राज्यातील ज्येष्ठ नेते म्हणून शरद पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस ने शिवसेनेसोबत सरकार स्थापण्याचा निर्णय घेऊ नये यासाठी शरद पवार यांची आपण भेट घेऊ असे ना रामदास आठवले यावेळी म्हणाले.

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेस राष्ट्रवादीला सत्तेतून हटविण्यासाठी शिवशक्ती भीमशक्ती एकजुटीचा नारा दिला होता. याचे स्मरण उद्धव ठाकरेंनी ठेवावे. शिवसेनेने सत्तेसाठी जर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जाण्याचा निर्णय घेतला तर तो महाराष्ट्राच्या जनतेच्या जनादेशाचा अवमान असेल त्याचबरोबर शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना मानणाऱ्या निष्ठावंत शिवसैनिकांना हा निर्णय रुचणार नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेला छेद देणारा निर्णय घेऊ नये.असे आवाहन ना रामदास आठवले यांनी केले आहे.

१९९५ मध्ये शिवसेना भाजप युती मध्ये शिवसेनेचे आमदार अधिक असल्याने शिवसेनेचा मुख्यमंत्री आणि भाजप चा उपमुख्यमंत्री असे सत्तवाटप झाले होते. आता हरयाणा मध्ये भाजप चे आमदार अधिक असल्याने भाजप चा मुख्यमंत्री आणि जे जे पी चे चौटाला उपमुख्यमंत्री असे सत्तवाटप झाले आहे.महाराष्ट्रातही ज्याचे अधीक आमदार त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र अधिक न्यायसंगत ठरते.तरी शिवसेना भाजप यांच्यात काय ठरलं ते एकत्र बसून पुन्हा ठरवून वाद मिटवावा असे आवाहन ना. रामदास आठवले यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना केले आहे.

शिवसेना भाजप ने एकत्र येऊन निवडणूकपूर्व युती करून महायुती म्हणून निवडणूका लढविल्या; त्यामुळे महायुतीला जनतेने स्पष्ट बहुमत दिले आहे. ही वस्तुस्थिती स्वीकारून भाजप शिवसेने एकत्र येऊन सरकार स्थापन करावे हाच महाराष्ट्राचा जनादेश आहे. महाराष्ट्राच्या जनतेच्या आदेशाची पायमल्ली शिवसेनेने करू नये .भाजप सोबत चा वाद शिवसेनेने चर्चेने मिटवावा असे आवाहन ना रामदास आठवले यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here