आदिवासी विकास महामंडळाचा धान भरडाई घोटाळा.

श्रमजीवी संघटनेच्या तरुणांनी पकडली काळ्या बाजारात जाणाऱ्या भाताची ट्रक.

वाहतूक भत्याच्या नावाखाली कोट्यावधींची लूट.

गोंदियाच्या मिलर्ससोबत आदिवासी विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांची हातमिळवणी.

पालघर-योगेश चांदेकर :

पालघर-अंबाडी वज्रेश्वरी रस्त्यावर तिरंगा हॉटेल समोर श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शासनाने भरडाईसाठी हमी भावात खरेदी केलेल्या भाताचा ट्रक काळ्याबाजारात नेत असताना पकडला, 250 भाताच्या गोणी यात आढळल्या. या ट्रक मध्ये भरलेला हा गोंदिया जिल्ह्यातील मिलर्स ला भरडाई साठी देऊ केला आहे, गोंदियाचा ट्रान्सपोर्ट पास घेऊन ही गाडी हा भात वसई तालुक्यातील विकण्यासाठी जात असताना कार्यकर्त्यांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिला. महिन्यांपूर्वी श्रमजीवी च्या कार्यकर्त्यांनी शहापूर येथे कर्नाटक येथुन बेकायदा येणारे तांदूळ पकडल्याची घटना घडली होती, त्यानंतरही आदिवासी विकास महामंडळ आणि परजिल्ह्यातील व्यापारी मिलर्स यांचे साटेलोटे तुटलेले नाही. पालघर ते गोंदिया असे तब्बल 250 ते 300 रुपये प्रती क्विंटल वाहतूक भत्ता घेऊन हा भात उचलला जातो मात्र गोंदिया येथे भरडाई साठी न नेता हा भात काळ्याबाजारात इकडेच किंवा अहमदाबाद मध्ये व्यापाऱ्यांना विकला जात असल्याची माहिती श्रमजीवी संघटनेचे युवक जिल्हा प्रमुख प्रमोद पवार आणि कार्यकर्त्यांना मिळाली होती. त्यानुसार आज हा भात पकडण्यात आला,यावेळी गोंदिया येथील मिलर्स मुकेश जैन यालाही गाडी सोबत पकडून गणेशपुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या घोटाळ्यात शासन खरेदी करत असलेल्या एक ते सव्वा लाख टन भातच्या या बोगस वाहतुकीत शासनाचे 10 ते 12 कोटी रुपयांची लूट करून हा भात काळ्याबाजारात विकून अपहार केला जात असल्याचे आज स्पष्ट झाले आहे.

महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ स्थानिक शेतकऱ्यांकडून हमी भावाने भात खरेदी करत असते, हा भात टेंडर प्रक्रिया करून भरडाईसाठी मिलर्स ला देऊन त्याची भरडाई करून त्याचे तांदुळ रास्त भाव दुकानात पुरवठा केला जातो, हे काम देताना स्थानिक राईस मिलर्स ला प्राधान्य देण्याचे शासन निर्णयात नमूद केले आहे. या प्रमाणे2 स्थानिक मिलर्स ने आम्ही 100 टक्के मिलिंग करण्यास तयार असल्याची हमी देणारे पत्र देखील स्थानिक मिलर्सने आदिवासी महामंडळाकडे दिले आहे. असे असताना खूप मोठ्या रक्कमेचा वाहतूक खर्च देऊन हा भात गोंदिया, भंडारा, रायगड इत्यादी ठिकाणच्या मिलर्स ला देण्यात येतो.
परिणामी हा खरेदी केलेला भात काळाबाजार विकला जातो आणि मग त्या बदल्यातील तांदूळ देताना कर्नाटक किंवा आंध्रप्रदेश येथून जुना स्वस्त आणि खाण्यास पौष्टिक नसलेला तांदूळ आणुन दिला जातो.

याबाबतचा घोटाळा श्रमजीवी संघटनेच्या तरुणांनी दोन महिन्यांपूर्वीच शहापूर येथे उघडकीस आणला होता,श्रमजीवी संघटनेचे संस्थापक आणि राज्यस्तरीय आदिवासी क्षेत्र आढावा समिती प्रमुख राज्यमंत्री विवेक पंडित यांनी याबाबत बैठक घेऊन चौकशी करण्याची सूचना दिली होती, या गैरव्यवहाराबाबत त्यांनी अहिकाऱ्यांना तंबीही दिली होती, मात्र भ्रष्टाचाराची कीड लागलेल्या अहिकाऱ्यांनी पुन्हा हा ठेका या बाहेरील मिलर्स ला देऊन शासनाच्या कोट्यवधी रूपयाची लूट चालवली होती. याबाबत माहिती मिळाल्याने श्रमजीवी संघटनेचे युवक जिल्हा प्रमुख प्रमोद पवार, श्रमजीवी कामगार संघटनचे सरचिटणीस ज्ञानेश्वर शिर्के, कामगार संघटना जिल्हा अध्यक्ष दिलीप गोतारणे, महिला जिल्हा प्रमुख जया पारधी,शेतकरी जिल्हा प्रमुख संगीता भोमटे, भिवंडी तालूका अध्यक्ष सुनील लोणे, उपाध्यक्ष केशव पारधी, संघटक आशा भोईर, विभाग सचिव जयेश पाटील, युवक तालुका प्रमुख जयदास मते,जयेश पाटील, शैलेश पाटील, भूषण घोडविंदे, वैशाली पाटील यांच्यासह संघटनेचे सभासद कार्यकर्ते यांनी वज्रेश्वरी रस्त्यावर तिरंगा हॉटेल शेजारी भाताची गाडी पकडली, या गाडीसोबत मिलर्स ला देखील पकडले आहे, या गाडीसोबत दोन ट्रान्सपोर्ट पास आढळले, एक गोंदिया कडे जाणार आणि एक वसई कडे जाणारा, मुळात गोंदिया कडे जाणाऱ्या रस्त्याचा वज्रेश्वरी रोडशी काहीही संबंध नाही, एकूणच हा शासनाचा भात काळ्यबाजारात जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये आदिवासी विकास महामंडळाच्या अहिकाऱ्यांचेही साटेलोटे आहे हे नक्की.

पकडलेली ट्रक गणेशपुरी पोलीसांच्या ताब्यात दिला असून पुढील तपास आणि गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश सागडे आणि पोलीस उपनिरीक्षक रवींद्र आव्हाड करत आहेत. याबाबत श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक भाऊ पंडित यांना माहिती दिली आहे,याबाबत त्यांच्या मार्गदर्शनाने या एकूण प्रकाराबाबाबत पुढील भूमिका घेण्यात येईल असे प्रमोद पवार यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here