तारापुरच्या MIDC मध्ये भीषण स्फोटात मृत्युमुखी झालेल्या कामगारांच्या कुटुंबीयांना सरकारकडून प्रत्येकी पाच लाख रुपये मदत

अपघाताची तातडीने चौकशी करण्याची जिजाऊ संघटनेची मागणी.

0
1370

पालघर-योगेश चांदेकर  :

पालघर- तारापुर MIDC मधील विकास केमिकल्स या कंपनीत भीषण स्फोट होऊन कंपनीच्या मालकासह 9 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या स्फोटाची तीव्रता इतकी भीषण होती की, आजुबाजुच्या 3 कंपन्यांना आगी लागल्या तर स्फोटाचे हादरे तब्बल 10 किलोमीटरपर्यंत जाणवले. या कंपनीत अमोनियम नाइट्रेट हे रसायन बनवले जात होते. मात्र बॉयलरचा स्फोट होऊन हा अपघात झाला आणि हे दुर्दैवी मृत्यू झाले.

कंपनीत झालेल्या स्फोटातील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रत्येकी 5 लाख रुपये घोषित केले असून जखमींना संपूर्ण वैद्यकीय साहाय्य दिले जावे असे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.

स्वतः मुख्यमंत्री हे बचाव कार्यावर लक्ष ठेऊन असून एनडीआरएफची मदतही घेण्यात येत आहे
मुख्यमंत्र्यांनी आज स्फोटाची माहिती मिळताच तात्काळ मुख्य सचिव व जिल्हा प्रशासनाकडून माहिती घेतली तसेच यामधील बचाव कार्यावर आणि जखमींच्या उपचारावर प्राधान्य द्यावे असे निर्देश दिले आहेत.

तसेच जिजाऊ संघटनेच्या वतीने या मृतात्म्यांस भावपूर्ण आदरांजली वाहण्यात येत आहे. तसेच “बोईसर तारापुर MIDC हा मृत्यूचा सापळा बनला असून दर आठवड्यात येथे अपघात होऊन निष्पाप कामगारांना जीव गमवावा लागत आहे. असे आजपर्यंत शेकडो अपघात झाले मात्र कुणाही दोषीवर कारवाई झाली नाही. त्यामुळे तातडीने या अपघाताची चौकशी करण्यात यावी आणि अपघातास जबाबदार असणाऱ्यांवर कडक करवाई करावी जेणेकरून भविष्यात असे अपघात होऊन निष्पाप जीव प्राणास मुकणार नाहीत,” अशी मागणी जिजाऊ संघटनेचे संस्थापक निलेशजी सांबरे यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here