धनगर महिलांच्या सहकारी संस्थांना शेळ्या-मेंढ्या गटावर ७५ टक्के अनुदान ; पदुम मंत्री महादेव जानकर

0
1230

मुंबई, दि. २५ : बंदिस्त शेळी-मेंढी पालन प्रकल्प सुरू करण्यासाठी भ.ज.क. प्रवर्गातील धनगर व तत्सम समाजातील महिलांच्या सहकारी संस्थांना ७५ टक्के अनुदान देण्याची योजना राबविण्यात येणार असून त्यादृष्टीने गतीने कार्यवाही करावी, असे निर्देश पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसायमंत्री महादेव जानकर यांनी आज येथे दिले.

महिला बंदिस्त शेळी-मेंढी पालन सहकारी संस्थांच्या प्रकल्पाच्या अनुषंगाने श्री.जानकर यांच्या अध्यक्षतेखाली आज तारापोरवाला मत्स्यालय येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

 

व्यक्तिगत स्तरावर योजनेचा लाभ घेण्याची आर्थिक क्षमता नसलेल्या धनगर व तत्सम समाजातील महिलांना दिलासा देण्यासाठी या योजनेची रचना करण्यात येत आहे, असे सांगून श्री.जानकर म्हणाले की, महिलांच्या नोंदणीकृत सहकारी संस्थांना 75 टक्के अनुदानावर शेळ्यांचे गट देण्याची योजना राबविण्यात येणार आहे. उर्वरित रकमेसाठी व्याजाने रक्कम घेऊ इच्छिणाऱ्या संस्थांना कर्ज देण्यासाठी महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि विदर्भ ग्रामीण बँकेने पुढाकार घ्यावा, असे श्री.जानकर यांनी बँकेच्या अधिकाऱ्यांना यावेळी सांगितले.

एका संस्थेत किमान २० ते कमाल ३० महिला सदस्य असणे आवश्यक असून सदस्य संख्येच्या प्रमाणात प्रतिसदस्य २० शेळ्या किंवा मेंढ्या आणि १ बोकड किंवा नर मेंढा वाटप केले जाणार  आहे. उर्वरित २५ टक्के रक्कम महिलांच्या संस्थेने उभी करावयाची आहे. या संस्था कोणत्याही कर्जाशिवाय स्वहिस्सा म्हणून ही रक्कम उभी करु शकतात किंवा २५ टक्केपैकी किमान ५ टक्के स्वहिस्सा आणि २० टक्के बँकेचे कर्ज हा पर्याय दिला जाणार आहे.

या बैठकीस पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार, पशुसंवर्धन आयुक्त लक्ष्मीनारायण मिश्रा, मत्स्यव्यवसाय विभागाचे प्रभारी आयुक्त सुमंत भांगे, पदुम विभागाचे उपसचिव विजय चौधरी,पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेळी-मेंढी विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.महेश बनसोडे, पदुम विभागाचे अवर सचिव विकास चौधरी, राजेश गोविल, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे मुख्य सरव्यवस्थापक संजय वाघ आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here