पालघर-योगेश चांदेकर :

पालघर-रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विनोद अंकुश वाघमारे हा मजूर खंडू माळी या वीटभट्टी मालकाने वेठबिगारी पाशात होता. विनोद याचा मालकाच्या मारहाणीनंतर संशयास्पद मृत्यू झाला. याबाबत विनोदची पत्नी सोनी याबाबत तक्रार देऊनही पोलिसांनी तक्रार घेतली नव्हती. याबाबत संतप्त श्रमजीवी संघटनेने रसायनी पोलीस ठाण्यावर मोर्चा आयोजित केला. सीआरपीसी च्या कलम 154 प्रमाणे आलेली फिर्याद असेल तशी दाखल करणे पोलिसांना बंधनकारक असताना तसे होत नसेल तर “तुमचा कायदा आम्हाला तुम्ही  शिकवा” अशी मागणी श्रमजीवीने केली होती.


पोलीस निरीक्षकांनी काल याबाबत गुन्हा दाखल केल्यामुळे मोर्चाचे रूपांतर मिरवणुकीत करत श्रमजीवी कडून पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे यांचा सन्मान करण्यात आला.

“देशाला स्वातंत्र्य मिळाले, मात्र देशातील गरीब कष्टकरी मजूर आजही पारतंत्र्यात आहेत हे दुर्दैव आहे” असे सांगत हा देशाचा शेवटच्या रांगेत असलेला नागरिक स्वतंत्र कधी होणार असा संतप्त सवाल श्रमजीवी संघटनेचे संस्थापक आणि राज्यस्तरीय आढावा समिती अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) विवेक पंडित यांनी केला.

रायगड मध्ये मोठ्याप्रमाणात आदिम कातकरी समाज आहे, या समाजाची अत्यंत दयनीय अवस्था आहे. भूक, गरिबी, दारिद्र्य आणि बेरोजगारीने समाजाला उध्वस्त केले आहे. त्यात बयाना (आगाऊ रक्कम) देऊन त्याला गुलाम बनवून वीटभट्टी, खदान यासारख्या ठिकाणी राबवून घेतले जाते. 1982 मध्ये श्रमजीवी संघटनेने या वेठबिगारीच्या अनिष्ट प्रथेविरोधात लढा उभारला होता, त्यानंतर ही पद्धत बंद झाली. 1976 च्या बंधबिगारी पद्धत उच्चाटन अधिनियमाच्या अंतर्गत अनेक गुन्हे दाखल झाले आणि वेठबिगार मुक्त झाले. मात्र आता पुन्हा वीटभट्टी मजूरांना असेच बयाना देऊन गुलामीत ठेऊन राबवले जात आहे. याबाबत विवेक पंडित स्वतः पुन्हा या लढ्यात उतरले आहेत. जव्हार मोखाड्यात अनेक आदिवासींचे स्थलांतर पंडित यांनी थांबवले, अनेक मालकांना समजावून सांगितले या मजूरांना नेऊ नका, त्यांना गावातच कामावर राहून मुलांचे शिक्षण करुदे, काही मालक ऐकले, मात्र जे मालक ऐकले नाही त्यांच्याविरोधात संघटनेने गुन्हे दाखल केले.

परवा नाशिक जिल्ह्यात वीटभट्टी, द्राक्षबागेतील मजूरांना मुक्त करून स्वतः विवेक पंडित यांनी तिथेही मालकांविरोधात गुन्हे दाखल केले.

आता परवा रायगड जिल्ह्यात देखील हे आंदोलनाचे लोण पसरले आहेत. येथेही आदिवासींवर विशेषतः कातकरी समाजावर प्रचंड अन्याय आहे. त्यात हा समाज शासनाकडूनही दुर्लक्षित आहे.

हा नियोजित मोर्चा होता, मात्र पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांनीही गुन्हा दाखल करण्याबाबत सकारात्मक तयारी दाखवली होती तर रजेवर असलेल्या पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे यांनी पंडित यांना संपर्क करून कायदेशीर दृष्टीने फिर्याद योग्य असून गुन्हा दाखल करण्याची तयारी दाखवत काल याबाबत गुन्हा दाखल केला, मागणी मान्य झाली म्हणून मोर्चाचे रूपांतर करून
पंडित यांनी स्वतः या मिरवणुकीत उपस्थित राहून रायगड पोलिस अधीक्षक आणि रसायनीच्या पोलीस निरीक्षक यांचे स्वतः कौतुक केले, विवेक पंडित यांच्या सोबतीने मयत विनोद च्या कुटुंबियांच्या हस्ते पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे यांचा सन्मान केला . आणि या गुन्ह्यात नकारात्मक भूमिका घेणाऱ्या पोलीस उपअधीक्षक यांना कायद्यानं वागण्याचा सूचक इशारा पंडित यांनी दिला.

कोणत्याही मालकाने कोणत्याही मजुराला बयाना देऊन आगाऊ बंधनात बांधून घेऊ नये, हीच पद्धत कायद्याने गुन्हा ठरवली आहे, जर असे करून कुणाला कामावर ठेवले तर त्या मालकाविरोधात कायदेशीर कारवाई शिवाय संघटना राहणार नाही असा इशारा पंडित यांनी दिला आहे.

यावेळी संघटनेचे संस्थापक तथा राज्यस्तरीय आदिवासी क्षेत्र आढावा समिती अध्यक्ष विवेक पंडित, सरचिटणीस बाळाराम भोईर, जिल्हा अध्यक्ष हिरामण नाईक, संजय गुरव, दशरथ भालके, राजेश चन्ने, योगिता दुर्गे, गणपत हिलम, मोतीराम नामकुडा, तसेच इतर राज्य जिल्हा तालुका पदाधिकारी उपस्थित होते. भव्य मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात जनसमुदाय उपस्थित होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here