महाराष्ट्राच्या रेशनवर कर्नाटकचा तांदूळ; एकाच मिलरचा 1 कोटी 34 लाखाचा घोटाळा

0
1490

पालघर – योगेश चांदेकर

शहापूर- महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळाची भात भरडाई प्रक्रिया कशी भ्रष्टाचाराने बरबटली आहे याचा पर्दाफाश झाला आहे. शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला भात ज्या मिलर्स ला भरडाईसाठी शासन देते आणि मिलर्स कडून त्याबदल्यात तांदूळ घेते या संपूर्ण प्रक्रियेत होणार गैरव्यवहार श्रमजीवी संघटनेचे युवक जिल्हा प्रमुख प्रमोद पवार यांच्या सह श्रमजीवी युवकांनी उघडकीस आणला. रायगड जिल्ह्यातील तळेगाव येथील धनंजय राईस मिल च्या नावाने शहापूर येथील शासकीय गोदामात येणारा तांदुळ हा प्रत्यक्ष कर्नाटक येथून येत असल्याचे आज समोर आले, या तांदळाच्या पूर्ण व्यापारात मोठा आर्थिक गैरव्यवहार असून यात अनेक अधिकारी सामील असल्याचा संशय व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे शासन निर्णय आणि केंद्र सरकारच्या आदेशांना पायदळी तुडवून बारदान ऐवजी प्लास्टिक बॅग्स मध्ये हे तांदूळ आणले जात आहेत. हेच तांदूळ रेशनवर जात असून महाराष्ट्राच्या रेशनवर कर्नाटकचा तांदूळ असे धक्कादायक चित्र आज समोर आले आहे. तब्बल 1 कोटी 34 लाख रुपयांचा हा धनंजय मिलर्स घोटाळा श्रमजीवीच्या तरुणांनी समोर आणला आहे.

आज शहापूरच्या शासकीय गोदामात गैरव्यवहाराचा हा तांदूळ येणार असल्याची माहिती श्रमजीवी संघटनेचे युवक जिल्हा प्रमुख प्रमोद पवार यांनामिळाली, ही माहिती  मिळताच भिवंडी तालुका अध्यक्ष सुनील लोणे, मुकेश भांगरे, कामगार संघटनेचे दिलीप गोतारने,रोहित पाटील ,विजय रावते आणि अन्य सहकाऱ्यांसह श्रमजीवी संघटनेच्या टीमने आज सायंकाळी गोदामात धडक दिली. यावेळी याठिकाणी कर्नाटक नोंदणीकृत असलेली मोठी ट्रक तांदूळ उतरवताना सापडली, या ट्रक मध्ये प्लास्टिकच्या बॅग मध्ये 50-50 किलोच्या  500 बॅग्स आणण्यात आल्या होत्या, वाहन चालक मोहमद जफर याला विचारले असता हा सगळा तांदूळ कर्नाटक हुबळी येथून तेथील ब्रोकर मार्फत आणला असल्याचे त्याने सांगितले.
जेव्हा येथील शासकीय  गोदाम पालक एस व्ही भगत यांना विचारले असता त्यांनी  हे तांदूळ धनंजय राईस मिल तळेगाव जि. रायगड यांच्या मार्फत आले असल्याची माहिती दिली. ट्रास्पोर्ट पास वर देखील रायगड येथून आल्याचे नमूद होते. मात्र प्रत्यक्षात हे तांदूळ कर्नाटक वरूनच आल्याचे निष्पन्न झाले.

11 ऑक्टोबर 2018 च्या शासन निर्णयानुसार तसेच केंद्र सरकारच्या निर्देशानुसार बारदान कलर कोडिंग बाबत नियमावली आहे, मात्र त्याचा भंग करत प्लास्टिक बॅग चा सर्रास वापर करून हा तांदूळ काळ्या बाजारात जाण्यासाठी पोषक वातावरण तयार केले जात आहे. असा आरोप प्रमोद पवार यांनी केला.

या भरडाई प्रक्रियेत 400 क्विंटल भाताच्या च्या एक लॉट ला 40 रुपये प्रती क्विंटल दराने 16000 रुपये शासनाकडून  मिळतात, तसेच हा भात गोदाम ते मिल नेण्यासाठी शासन किलोमीटर प्रमाणे शासन दरात वाहतूक भाडे दिले जाते. या भाताच्या मोबदल्यात हाच भात मिलिंग करून अथवा मिलर्स कडे असलेला तयार तांदूळ 400 क्विंटल भाताच्या बदल्यात 270 क्विंटल म्हणजे 67% तांदूळ देण्याचे बंधनकारक असते. यात या भागातील भातशेती करणाऱ्या शेतकऱ्याला हमीभाव आणि चांगला बाजार मिळावा, तसेच येथील रेशनकार्ड धारकांना स्थानिक आणि चांगले तांदूळ मिळावे या हेतूने प्रक्रिया आहे, याभागात पिकलेला स्थानिक तांदूळ काही अंशी तुकड्यात असला तरी तो पोषक आणि चवीचा वाटतो,आणि त्याच तांदळाची मागणी अनेकदा कार्ड धारक करतात.  मात्र या सगळ्या हेतूला मूठमाती देऊन महाराष्ट्राच्या रेशनवर चक्क कर्नाटक चा तांदूळ देण्याचे काम केले जाते. हा प्लास्टिक बॅग मध्ये येणार तांदूळ दिसताना पॉलिश दिसतो मात्र तो खाण्यास चांगला नसल्याचेही अनेकांचे मत आहे.

असा आहे घोटाळा

आज ज्या मिलर्स चा घोटाळा बाहेर आला त्या धनंजय राईस मिल ने महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळाचे 20 लॉट पूर्ण केले आणि आता अजून 54 लॉट काम सुरू आहे म्हणजे तब्बल 29 हजार 600 क्विंटल भात केवळ महामंडळाचा त्यानें घेतला असून याव्यतिरिक्त दि महाराष्ट्र स्टेट को ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लि. जिल्हा कार्यालय  ठाणे यांच्याकडून यावर्षी 15 हजार 156 क्विंटल भात उचल केली आहे, त्यातही त्याने असेच कर्नाटक येथून तांदूळ आणून घोटाळा केला आहे. हा माल उचलताना मुरबाड येथील जवळचा मिलर्स मिलिंग करण्यास तयार असताना त्याला डावलून धनंजय मिल ला काम देण्यात आले. असे ठाणे जिल्ह्यातील एकूण 44 हजार 756 क्विंटल भात याने उचललेले आहे.याचा मिलिंग दर  17 लाख 90 हजार 530 रुपये होतो, त्यात हा भात इथून रायगड मध्ये नेण्याचे 109 रुपये प्रति क्विंटल म्हणजे 48 लाख 78 हजार 404 रुपये तर् पुन्हा तांदूळ आनण्याचे वाहतुकीचे पैसे 29 हजार 986 क्विंटल तांदळाचे मिळणारे वाहतूक भाडे 32 लाख 68 हजार 530 रुपये इतके म्हणजे एकूण 81 लाख 46 हजार 930 रुपये हा केवळ वाहतूक भाडे याला मिळणार आहे. . या भाताच्या भरडाई ल 40 रुपये प्रति क्विंटल शासन देते म्हणजे ते पैसे मिळवून एकूण  99 लाख 37 हजार 460 रुपये हा धनंजय मिलर शासनाकडून हडपणार आहे.त्यात या तांदळांसाठी 60 हजार बारदान शासन देते, शासनाच्या बारदान ची किंमत 64 रुपये प्रति बारदान असे एकूण 38 लाख 40 हजार रुपये किंमतीचे बारदान शासनाने देऊ केले आहेत, आता हा मिलर प्लास्टिक बॅग ही 5 रुपये किमतीची वापरतो म्हणजे 3 लाख रुपये खर्च होतो म्हणजे 35 लाख 40हजार रूपये निव्वळ नफा असे एकूण 1 कोटी 34 लाख 77 हजार 460 रुपये निव्वळ खुला घोटाळा हा धनंजय राईस मिलर करत आहे, हा एकाचा घोटाळा आहे, बाकी इतरही पर जिल्ह्यातील मिलर हाच प्रकार करत आहे.

आशा गैरव्यवहारामुळे हा मिलर्स महामंडळ आणि फेडरेशन यांच्या अधिकाऱ्यांची मर्जी राखून आहे, परीणाम स्थानिक मिलर्सला प्रामाणिक काम करून हे काम परवडत नाही, स्थानिक ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील काम करण्यास तयार असणाऱ्या मिलर्स चे खच्चीकरण करून आशा परजिल्ह्यातील धनाढ्य मिलर्सच्या तिजोऱ्या अधिकारी भरत आहेत. म्हणून हे  स्थानिक मिलर्स पुढे येत नाही.
विशेष म्हणजे रायगड मधील हा मिलर रायगड जिल्ह्यात सुमारे पावणे दोन लाख क्विंटल भात फेडरेशन ने खरेदी केला असताना त्याची मिलिंग न करता हे वाहतूक खर्च हडप करण्यासाठी ठाणे आणि पालघर जिल्ह्यात थैमान घालत आहे. यासारखे रायगड जिल्ह्यातील इतर धनाढ्य मिलर्स देखील यात सहभागी असून ते ही असाच कागदांचा खेळ करून शासनाला लुबाडत आहे.

आज श्रमजीवी संघटनेच्या तरुणांनी हा घोटाळा ऐरणीवर आणला असून याबाबत जिल्हा पुरवठा अधिकारी जयसिंग वळवी यांना माहिती देऊन त्यांनी पाठविलेल्या पुरवठा निरीक्षक शहापूर यांनी स्थळ पंचनामा केला आणि श्रमजीवी संघटनेचे प्रमोद पवार यांचा तसेच कर्नाटक येथील चालकाचा जबाब घेऊन सदर प्रकरणाबाबत वरिष्ठांना अहवाल देणार असल्याचे सांगितले. याबाबत प्राथमिक माहिती मिळताच श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांनी आदिवासी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांना या अपहाराबाबत कळवले असल्याचे प्रमोद पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
याबाबत संस्थापक विवेक पंडित आणि ठाणे जिल्हा अध्यक्ष अशोक सापटे यांच्या मार्गदर्शनाखाली याबाबत पुढील पाठपुरावा करणार असल्याचे पवार यांनी सांगितले.

पंचनाम्यावेळी युवक जिल्हा प्रमुख  प्रमोद पवार यांच्यासोबत भिवंडी तालुका अध्यक्ष सुनील लोणे, कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिलीप गोतारणे, जिल्हा सचिव दशरथ भालके, जिल्हा युवक उप प्रमुख प्रवीण जोगळे, मुकेश भांगरे, रोहित पाटील, विजय रावते, शरद भोये, इत्यादी कार्यकर्ते तसेच सामाजिक कार्यकर्ते जयेश पवार उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here