पालघर : योगेश चांदेकर

पालघर-राज्य उत्पादन शुल्क विभागाने डहाणू तालुक्यातील बोर्डी जवळील अस्वाली सावेवाडी जलवाई येथे मद्यनिर्मिती कारखान्यावर छापा टाकला. या धड़क कारवाईत कारखान्यातील ४८ लाख, ७७ हजार,५८४ रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अनधिकृत मद्यनिर्मिती कारखान्यावर केलेली ही आजपर्यंतची सर्वात मोठी कारवाई असल्याचे समजते. पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या बोर्डीसारख्या निसर्ग रम्य परिसरात बेकायदेशीर मद्यनिर्मिती कारखान्यावर झालेल्या या कारवाईमुळे तालुक्यात खळबळ माजली आहे.

 

राज्य उत्पादन शुल्क पालघरचे अधीक्षक डॉ. बुकन यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क डहाणूचे निरीक्षक वैभव वैद्य यांनी ही धड़क कारवाई ( दि.२ डिसेंबर) केली. घटनास्थळी पत्र्याच्या शेडमध्ये मद्यनिर्मिती कारखान्यावर धाड टाकली असता तेथे प्लास्टिक विविध आकार क्षमतेचे कॅन, काचेच्या बाटल्या, मद्य बाटल्या भरण्याचे मशीन,बुच, वाइन साठवण्याची टाकी,बाटल्या धुण्याचे यंत्र,लेबल, यासारख्या वस्तू हस्तगत केल्या.

जिल्ह्यातील आजपर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई असून एका आरोपीला ( वय ३३ ) अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर सी आर ९८ / २०१९ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून महाराष्ट्र मद्यनिषेध कायदा १९४१ च्या कलमांतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. याबाबत डहाणूचे दुय्यय निरीक्षक ए व्ही सोनावणे व कर्मचारी पुढील तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here