पालघर-योगेश चांदेकर

पालघर-डहाणू तालुक्यातील ग्रामीण भागातील रायतळी ग्रामपंचायत हद्दीतील गाव पाड्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर बनली असून येथील ग्रामस्थांना कोसळून डबक्यासारखी अवस्था झालेल्या विहिरीतील गढूळ पाणी पिण्याची वेळ आली आहे. दुःखाची बाब म्हणजे याच डबक्यातील पाणी परिसरातील गुरेढोरे जनावरे देखील पीत असल्यामुळे पाणी टंचाईच्या दाहकतेने मनुष्य आणि जनावरे यांतील अंतर पुसले आहे.

सुमारे २७२८ लोकसंख्या असलेले रायतळी हे गाव गंजाड नजीक असून येथील चांदवड,राजडपाडा व डोंगरीपाडा या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचे मोठे संकट ठाकले आहे. येथे सुमारे १० वर्षांपूर्वीपासून एक कोसळलेल्या अवस्थेत विहीर आहे. ग्रामस्थांनी या विहिरीचे बांधकाम व खोदकाम करून ग्रामस्थांना पाणीपुरवठा करावा यासाठी अनेकदा लेखी तक्रारी व निवेदने देऊनही विहिरीचे काम केले नाही. त्यामुळे ग्रामस्थांनीच कोसळलेल्या विहिरीत खड्डा खोदला. त्या पाण्याचा उपयोग गावकरी करत. मात्र यावर्षी आजूबाजूच्या गावांतील पाण्याची पातळी घसरल्याने येथील अनेक विहिरी कोरड्या पडल्या. तसेच नदीनाल्यांचे खोलगट भाग पाण्याशिवाय कोरडे पडल्याने गाई,गुरेढोरे, जनावरे यांनादेखील पाणी मिळेनासे झाले आहे. या भागात कोसळलेल्या विहिरीच्या डबक्यात थोडेसे पाणी उरले आहे. त्यामुळे आजूबाजूच्या गावातील लोकाना पिण्याच्या पाण्यासाठी हा एकमेव आधार उरला आहे. या डबक्यात गढूळ पाणी असून तेच पाणी गावकरी पिताहेत. त्यामुळे पाण्यातून पसरणाऱ्या रोगांची त्यांना लागण होण्याची शक्यता आहे. तसेच हेच पाणी गुरेढोरे पीत असल्याने पाण्याची समस्या बिकट झाली आहे.

१. ” कोसळलेल्या विहिरीच्या बांधकामासाठी आमदार निधीतून खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. लवकरच ही विहीर खोदून विस्तारित केली जाईल. रायतळी येथील लघु पाटबंधारे धरणातून नळपाणी योजना अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे लवकरच ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली जाईल” — दिलीप कोठारी, सरपंच रायतळी

२.” कोसळलेल्या विहिरीचे पाणी ग्रामस्थांनी पिऊ नये यासाठी ग्रामसभेत सूचना दिल्या आहेत. चांदवड येथे १ कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर झाली असून त्याचा लाभ ग्रामस्थांना होणार आहे. याबाबतची माहितीदेखील ग्रामसभेत दिली आहे. ग्रामस्थांना निर्मल शुद्ध पाणी पुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी शासकीय योजनांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत.”
पी डी राजपूत, ग्रामसेवक – रायतळी

३.” गावात लोकांना व जनावरांना पिण्यासाठी एक विहीर आहे तीसुद्धा कोसळलेल्या डबक्याच्या अवस्थेत. ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे पाणीपुरवठ्यासाठी वेळोवेळी अर्ज सादर केले आहेत. गावातील महिलांना पाण्यासाठी दररोज वणवण भटकावे लागत आहे. याबाबत तक्रार करूनही कुणीच लक्ष देत नाही. ” — विजय राजड, ग्रामस्थ, रायतळी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here