रुग्णसेवेचे व्रत यशस्वीपणे पेलणारी शीतल पाटील-चांदेकर

0
1395

मुंबई विशेष प्रतिनिधी

रुग्णांच्या दुःखावर फुंकर घालून त्यांना आजारपणातुन बरं करण्यासाठी डॉक्टरांच्या बरोबरीने रुग्णसेवा करणारी पालघर जिल्ह्यातील दापोली येथील शीतल हरिश्चंद्र पाटील (चांदेकर) ह्या परिचारिकेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. रुग्णसेवेतील योगदानाबद्दल त्यांना सर्वोत्कृष्ट परीचारीका म्हणून सन्मानित करण्यात येणार आहे. अवघ्या सहा वर्षे सेवाकाळात त्यांनी व्रतस्थपणे रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा समजून कार्य केले. त्यामुळेच त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शालेय व परिचारिका शिक्षण प्रशिक्षण पूर्ण करून मुंबईतील नामवंत रुग्णालय म्हणून ख्यातकीर्त असलेल्या नायर हॉस्पिटलमध्ये त्यांनी परिचारिका म्हणून रुग्णसेवेचा आरंभ केला. सर्व रुग्णांची अंतःकरणाने शुश्रूषा करण्यात त्यांनी नेहमीच धन्यता मानली. हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे पेशंटला नियमितपणे औषधे देणे, इंजेक्शन देणे, सलाईन लावणे, शस्त्रक्रिया करण्यासाठी साहाय्य करणे, ड्रेसिंग करणे, इत्यादी कामे त्यांनी कर्तव्यनिष्ठपणे बजावली. या कर्तृत्वाबद्दल त्यांना नायर मध्ये स्टाफ नर्स म्हणून बढती मिळाली. रुग्णसेवेची आवड असलेल्या शीतल पाटील यांनी रुग्णांच्या नातेवाईकांनादेखील आपल्या कार्याने प्रभावित केले. तसेच, त्यांनी रुग्णालयातील सर्व वैद्यकीय अधिकारी, सहकारी कर्मचारी यांच्याशी सौहार्दाचे संबंध जोपासले आहेत.

पालघरसारख्या ग्रामीण भागातील नर्सने आपल्या सेवेद्वारे मुंबईच्या नामवंत रुग्णालयात उत्तम योगदान दिल्यामुळेच त्यांचा सन्मान सोहळा जिल्हावासीयांसाठी पर्वणी ठरणार आहे. रुग्णसेवेचा त्यांनी घेतलेला वसा अनेकांना प्रेरणा देणारा आहे. आधुनिक काळात धकाधकीच्या जीवनात लोप पावत चाललेला मानवतेचा झरा शीतल यांनी आपल्या कार्यातून सिद्ध करून दाखवला आहे.

शीतल पाटील यांच्या सेवाकार्यात त्यांचे पती पत्रकार योगेश चांदेकर यांचा महत्वाचा वाटा आहे. सामाजिक प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी चांदेकर यांनी इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मीडियाच्या माध्यमातून सामाजिक व राष्ट्रीय सेवाकार्य करत आहेत. आपल्या पतीने स्वीकारलेल्या कार्याशी संलग्न राहून शीतल पाटील – चांदेकर निस्वार्थपणे व कर्तव्य भावनेने आज कार्य करीत आहेत. यशस्वी पुरुषांच्या जीवनात जसा स्त्री चा वाटा असतो तशाच प्रकारे यशस्वी महिलांच्या पाठीमागे पुरुषांचा देखील सिंहाचा वाटा असतो हे शीतल पाटील चांदेकर या दाम्पत्याने जगाला दाखवून दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here