लातूर जिल्ह्यात पैशाची बॅग समजून चोरानी पळवल्या बारावीच्या उत्तरपत्रिका

0
1834

लातूर (१४ मार्च) : निलंगा तालुक्यातील केळगाव येथे अज्ञात चोरट्यांनी पैशाची बॅग समजून बारावी शालांत परिक्षेच्या उत्तरपत्रिका पळवल्याची घटना घडलीय. दोन प्राध्यापक बारावी शालांत परीक्षेच्या उत्तर पत्रिका घेऊन जात असताना गाडीतील उत्तरपत्रिका काच फोडून अज्ञात चोरट्यांनी पळवून पोबरा केलाय.  याप्रकरणी प्राचार्यांच्या फिर्यादीवरून निलंगा पोलीस स्टेशन मध्ये अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, आनंद मुनी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय केळगाव येथे मराठवाड्यातील अन्य ठिकाणचे पेपर तपासण्यासाठी आले आहेत. यातील मराठी विषयाचे प्रा. नेताजी भानुदास काळे व रसायनशास्त्र विषयाचे प्रा. दत्ता शेषराव कुलकर्णी यांच्याकडे प्राचार्यांनी उत्तरपत्रिका तपासण्यासाठी सोपविल्या. मात्र आज दि. १४ रोजी या दोन्ही प्राध्यापकांनी मराठी विषयाच्या न तपासलेल्या ३० उत्तर पत्रिका येऊन जळकोट येथे मार्गदर्शन घेण्यासाठी,  तर रसायन शास्त्र विषयाच्या २५ उत्तर पत्रिका घेऊन मॉडरेटरकडे जमा करण्यासाठी निलंगा येथे आले.

हे दोघे प्राध्यापक त्यांचे सहकारी प्रा. सूर्यकांत माळी यांच्या गाडीतून निलंग्याला आले. दरम्यान प्रा. माळी यांनी लातूर जिल्हा मध्यवर्ती मार्केट शाखा येथे गाडी आणली व बँकेतील व्यवहार आटोपून सर्वजण बसस्थानकासमोरील हॉटेलात चहा पिण्यासाठी थांबले. यावेळी हॉटेल बाहेर थांबलेल्या गाडीत कोणीच नसल्याचे पाहून आणि बँकेपासून नजर ठेवून अज्ञात चोरट्यांनी गाडीच्या काचा फोडल्या. काचा फोडल्यानंतर चोरट्यांनी पैसे समजून आतील कापडी पिशव्यांचे गठ्ठे पळवलेत.

विद्यार्थ्यांच्या परिक्षेच्या उत्तरपत्रिकाच चोरट्यांनी पळवल्याने विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा मात्र यामुळे प्रश्न निर्माण झालाय. त्यामुळे पोलिस यंत्रणेचे देखील धाबे दणाणले असून तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यात येत आहेत.

By mumbaienews.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here