जंगल आमच्या हक्काचे; नाही कुणाच्या बापाचे

हजारो श्रमजीवी वन हक्क दावेदार रस्त्यावर

वन हक्कासाठी श्रमजीवी आक्रमक; ठाण्यात भव्य मोर्चा

पालघर-योगेश चांदेकर

पालघर-केंद्र सरकारच्या प्रस्तावित  भारतीय वन कायदा सुधारणा-२०१९ या विधेयकाच्या मसुद्यातील तरतुदी या आदिवासी कष्टकरी वन हक्क दावेदारांना उद्धवस्त करणारे आहे असे सांगत श्रमजीवी संघटनेने भव्य मोर्चा काढला. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत श्रमजीवीने “जंगल आमच्या हक्काचे ,नाही कुणाच्या बापाचे” या घोषणेने ठाणे शहर दणाणून सोडले. या विधेयकाच्या अन्यायकारक तरतुदींना विरोध करणारे निवेदन यावेळी केंद्र सरकारला जिल्हाधिकाऱ्यांना सुपूर्द करण्यात आले. यावेळी मोर्चात आणलेली आदिवासींच्या पारंपरिक “हिरव्या देवाची पालखी” लक्षवेधी होती. ठाणे जिल्हा अध्यक्ष अशोक सापटे यांच्या नेतृत्वाखाली काढलेल्या या मोर्चात संघटनेचे राज्याचे अध्यक्ष रामभाऊ वारणा, उप कार्याध्यक्ष स्नेहा दुबे पंडित यांची प्रमुख उपस्थिती होती. मोठ्या संख्येने आदिवासी श्रमजीवी महिला पुरुष युवक सहभागी झाले होते.


केंद्र सरकारने जागतिक तपमान वाढीच्या  नावाखाली जंगलातील आदिवासी व इतर पारंपरिक वननिवासी जनतेच्या हक्कांवर गदा आपणारा सुधारित वन कायदा तयार करण्याचे ठरविले असून त्यासाठी भारतीय वन कायदा ( सुधारणा ) – २०१९ हे विधेयक जाहिर केले आहे . हा जुलमी वन कायदा म्हणजे अदिवासी व पारंपरिक वननिवासी यांच्या परंपरागत वन हक्कांवर आणलेली गदा आहे . व आपल्या उपजिविकेसाठी जंगलावर निर्भर असलेल्या आदिवासींच्या हातातून जंगलचे अधिकार काढून घेवून वनक्षेत्र वाढविण्याच्या नावाखाली बड्या भांडवलदरांना कॅशक्रॉपची वनशेती करता यावी यासाठी रान मोकळे करण्यासाठीचे धोरण सरकार अवलंबून पाहत आदिवासी पारंपारिक वननिवासींच्या हिताच्या विरोधी भुमिका घेवून व्यापारी वनशेतीला उत्तेजन देणाऱ्या , वनअधिकाऱ्यांना अमर्याद अधिकार देवून आदिवासींचे वन हक्क डावलू पाहणाऱ्या, ग्रामसभेचे अधिकार कमी करून ग्रामवनांची समांतर पध्दत आणू पाहणाऱ्या  सरकारच्या भुमिकेला संघटनेने प्रखर विरोध केला.

यावेळी आदिवासी आणि अन्य पारंपरिक वननिवासी बांधवाना उद्धवस्त करणाऱ्या तरतुदी या मसुद्यातून वगळाव्या
तसेच वन अधिकाऱ्यांना दिलेले जुलमी अमर्याद अधिकार काढून घ्यावेत. वनांचे खाजगीकरण करण्याचे धोरण बदलावे आशा मागण्या करत हा अन्यायकारक विधेयक मागे घेण्याची मागणी श्रमजीवीने केली. यावेळी श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ वारणा, उपाध्यक्ष दत्तात्रेय कोळेकर, कार्याध्यक्ष केशव नानकर, उप कार्याध्यक्ष स्नेहा दुबे पंडित ,सरचिटणीस बाळाराम भोईर, सरचिटणीस विजय जाधव, जिल्हा अध्यक्ष अशोक सापटे, पालघर जिल्हा अध्यक्ष सुरेश रेंजड, उपाध्यक्ष गणपत हिलीम, जिल्हा सचिव राजेश चन्ने ,दशरथ भालके यांच्यासह सर्व जिल्हा तालुका पदाधिकारी, घटक प्रमुख उपस्थित होते.
__________
रानभाज्या आणि पारंपरिक वेशभूषा
यावेळी मोर्चामध्ये आदिवासी कष्टकरी बांधव पारंपारिक वेशभूषा परिधान करून आले होते, जंगलचे राजेच जणू मोर्चात सहभागी झाले असे दृश्य होते. यावेळी आदिवासी महिलांनी जंगलातून मिळणाऱ्या रानमेव्याच्या टोपल्या घेऊन आल्या होत्या, रानमेवा हे आमच्या उदरनिर्वाहाचे साधन आहे हे यावेळी दाखवून दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here