श्रमजीवीचा तूर्तास कोणत्याही पक्षाला पाठिंबा नाही.

राज्य-जिल्हा पदाधिकाऱ्यांची उच्चस्तरीय समिती गठन करून लवकरच घेणार पाठिंब्याचा निर्णय.

पालघर-योगेश चांदेकर

पालघर-विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज श्रमजीवी संघटनेच्या राज्य व्यवस्थापन समितीची विशेष बैठक आज उसगाव येथे श्रमजीवीच्या मुख्यालयात पार पडली. ठाणे, पालघर,रायगड,नाशिक आणि मुंबई जिल्ह्यातील राज्य,जिल्हा,तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा या बैठकीत सहभाग होता. यावेळी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीतील संघटनेच्या भूमिकेबाबत आज साधक बाधक चर्चा करण्यात आली. निवडणुकीत कोणत्या पक्षाला पाठींबा द्यायचा हा निर्णय संघटनेने राखीव ठेवला. पाचही जिल्ह्यात बहुतांश मतदारसंघात श्रमजीवी संघटनेची मतं निर्णायक असल्याने संघटनेच्या भूमिकेवर अनेक उमेदवारांचे भवितव्य असून सगळ्यांचे लक्ष या निर्णयावर लागलेले आहे.

आज झालेल्या बैठकीत श्रमजीवी लढा देत असलेल्या जनहिताच्या अनेक प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. वन जमीन, मिळलेल्या वन प्लॉटची सुधारणा, आदिवासींच्या आरोग्याचे, शिक्षणाचे प्रश्न ,कुपोषण निर्मूलन यांसारख्या प्रश्नावरील मागण्यांच्या आधारावर पाठींबा देणे न देणे अवलंबून असल्याचा बैठकीचा सुर होता. हा अंतिम निर्णय घेण्यासाठी संघटनचे राज्याचे अध्यक्ष रामभाऊ वारणा यांच्या अध्यक्षतेखाली राज्य,जिल्हा प्रमुख पदाधिकारी, कामगार संघटनेचे प्रमुख पदाधिकारी अशी उच्चस्तरीय समिती गठन करण्याचे ठरले.या समितीला आपल्या मागण्यांबाबत धोरण ठरवून निर्णय घेण्याचा निर्णय आज व्यवस्थापन सभेने दिला.

कोणत्याही पाठींबा दिला नाही तर या विधानसभा निवडणुकीत संघटना काही ठराविक मतदारसंघात स्वबळावर उमेदवार उभे करू शकेल अशीही शक्यता नाकारता येत नाही.

संघटनेच्या आदेशाचे उल्लंघन केल्यास सक्त कारवाई :
संघटनेची मत ही निष्ठेला बांधील असल्याचा प्रत्येकनिवडणुकीचा  अनुभव आहे, मात्र तरीही कुठेही कोणत्याही पदाधिकारी अथवा सभासद,कार्यकर्त्याने संघटनेच्या आदेशाविरोधात काम केले, आदेशाचे उल्लंघन केले तर त्याच्यावर तातडीने कारवाई करण्याबाबतचा ठराव यावेळी करण्यात आला.

संघटनेचा राजकीय पक्षांना, उमेदवारांना  सज्जड इशारा – संघटनेच्या परवानगीशिवाय कोणत्याही उमेदवाराने आपल्या पत्रकात, बॅनर, पोस्टरवर कुठेही संघटनेचे प्रतीक, नाव, अध्यक्ष, संस्थापक किंवा अन्य कुणाचाही फोटो ,नाव वापरल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा स्पष्ट इशारा यावेळी संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ वारणा यांनी यावेळी राजकिय पक्ष आणि उमेदवारांना दिला.  या वेळी संघटनेचे कार्याध्यक्ष केशव नानकर,सरचिटणीस बाळाराम भोईर – विजय जाधव, ठाणे जिल्हा अध्यक्ष अशोक सापटे, पालघर जिल्हा अध्यक्ष सुरेश रेंजड यांच्यासह संघटनचे सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते तसेच कामगार संघटना पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here