घोटी पोलीस ठाण्यात वीटभट्टी मलकविरोधात वेठबिगारीचा गुन्हा दाखल.

श्रमजीवी संघटनेच्या वेठबिगारी विरोधातील आंदोलनाचे लोण नाशिक जिल्ह्यात.

0
1445

पालघर-योगेश चांदेकर : पालघर- नाशिक मधील घोटी येथे एका वीटभट्टी मालका विरोधात बंधबिगार पद्धती (उच्चाटन) अधिनियम 1976 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंटू गोविंद रण असे पीडित वेठबिगार मजुराचे नाव असून बाळु निवृत्ती जाधव असे गुन्हा दाखल झालेल्या वीटभट्टी मालकचे नाव आहे.
मालक बाळु जाधव रा. टाकेद याने पिंटूला त्याच्या गरिबी व अज्ञानाचा फायदा घेऊन २० हजार रुपये बायना म्हणजे
उचल दिली होती. त्या बदल्यात पिंटू व त्याची पत्नी रविता यांच्याकडुन कामाचा योग्य मोबदला न देता व फिर्यादी आजारी असतांना जुलूम जबरदस्तीने व शिवीगाळ करून मालकाकडून काम करून घेतले जात होते. याबाबतची माहिती मिळताच राज्यस्तीय आदिवासी क्षेत्र आढावा समितीचे अध्यक्ष व श्रमजीवी संघटनेचे सस्थापक श्री विवेक पंडित यांनी तात्काळ दाखल घेत घोटी पोलिस ठाण्यात मालक विरोधात बंधबिगार पद्धती (उच्चाटन) अधिनियम 1976 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

आदिवासी मजुरांना बयाना (उचल, रक्कम) देऊन गुलामगिरीच्या पाशात अडकविण्याच्या अन्यायकारक अशा वेठबिगार प्रथे विरोधात श्रमजीवी संघटनेने लढा उभा केला आहे. गेल्या १५ दिवसांत ठाणे आणि पालघर जिल्ह्यात एकुण चार विटभट्टी मालकांवर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल झाले आहेत. त्यानंतर बुधवारी नाशिक जिल्ह्यात पहिल्यांदाच घोटी पोलिस ठाण्यात अशा प्रकारचा गुन्हा नोंद झाला आहे.

इगतपुरी तालुक्यातील टाकेद येथील बाळू जाधव या वीटभट्टी मालकाकडून पिंटू रण वय २८ रा. तारांगणपाडा, ता. इगतपुरी याला वेठबिगारीने राबवले जात असून त्याच्या कामाचा योग्य मोबदला न देता व आजारी असतांना जुलूम जबरदस्तीने व शिवीगाळ करून त्याचे आर्थिक शोषण होत असल्याबद्दल श्रमजीवी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार विवेक पंडित यांना समजले. त्यानुसार त्यांनी स्वत: घटनास्थळी जाऊन खात्री केली. वेठबिगारी करणा-या आदिवासी कुटुंबाला सोडवून त्यांनी पोलिसांकडे धाव घेईल. त्यानुसार फिर्यादी पिंटू गोविंद रण यांनी घोटी पोलिसांकडे फिर्याद दाखल केली. त्यानुसार घोटी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

आरोपी वीटभट्टी मालक बाळु जाधव रा. टाकेद याने जुलै महिन्यात २ हजार आणि त्यानंतर १८ हजार रुपये अशी एकूण २० हजार रूपये उचल दिली होती. त्या बदल्यात गणपत वाघ रा. अडसरे यांच्याकडुन त्यांचे राहते घर लिहुन घेतले. उचल फेडण्याकरीता त्यांच्या विटभट्टीवर पिंटू रण याने काम करुन द्यायचे ठरवले. त्याप्रमाणे पिंटू व त्याची पत्नी रविता हिच्यासहदिवाळीपासुन आजपर्यंत कामावर होते. मात्र काम कमी केल्याचे सांगत बाळू जाधव याने फिर्यादीच्या अज्ञानपणाचा व गरिबीचा फायदा घेवून शिविगाळ करत जबरदस्तीने काम करुन अत्याचार करत असे. या प्रकरणी घोटी पोलिस ठाण्यात – गु.र.नं.९१/२०१९ बंधिबगार वेठबिगारी पध्दती (उच्चाटन ) अधिनियम १९७६ चे कलम १६,१७,१८ प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक जालिंदर पळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

दरम्यान वेठबिगार प्रथे विरोधातील लढ्याबाबत श्री विवेक पंडित हे मजुरांसोबत मालकांशीही संवाद साधत असून त्यांनी बयाना पद्धत बंद करायचे आवाहन केले, मजुरांना स्वावलंबी बनू द्या, बयाना देऊन त्यांना अपंग करायचे मग त्यांचे शोषण करायचे हे अनिष्ट आहे, त्यांना रोजगार हवा आहे हे खरे आहे, मात्र त्याबाबदल्यात त्यांना योग्य मोबदला आणि सन्मान मिळणे हा त्यांचा हक्क आहे असे पंडित यांनी सांगितले. आम्ही मालकांचे वैरी नाही मात्र मजुरांचे शोषण झाले तर कारवाई होणार मग त्यानंतर संघटनेला कुणीही दोष देऊ नका असे पंडित यांनी पुन्हा अदोरेखीत केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here