मुंबईमध्ये CST जवळ मोठी दुर्घटना, पादचारी ब्रिजचा भाग कोसळून ५ जण मृत्युमुखी तर ३६ जखमी

0
1317

मुंबई (१४ मार्च): मुंबईमध्ये सीएसटी जवळ पादचारी पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत पाच जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर या दुर्घटनेत ३६ जण जखमी आहेत. दुर्घटनेत मृत्यू पावलेल्यांच्या नातेवाईकांना ५ लाख तर जखमींना प्रत्येकी ५० हजारांची मदत सरकारने जाहीर केली आहे.

आज (गुरूवार) संध्याकाळी ७:३० च्या दरम्यान ही घटना घडली असून ३६ जण जखमी झाल्याची माहिती एएनआयआय या वृत्तसंस्थेने दिलीय. जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर असून, अपूर्वा प्रभू (३५ वर्षे), रंजना तांबे आणि सिराज खान (३२ वर्षे), भक्ती शिंदे (४० वर्षे), तपेंद्र सिंग (३५ वर्षे) अशी मृत पावलेल्यांची नावे असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिलीय. कोसळलेल्या पुलाचा मलबा अजूनही पूर्णपणे हटवलेला नसल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जखमींना सेंट जॉर्ज, जीटी तसेच सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेनंतर तातडीनं या भागात मदतकार्य सुरू करण्यात आले असून पोलीस आणि अग्निशमन दलाच्या ५ गाड्या सध्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या दुर्घटनेमुळे आपण व्यथित झाल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट केलय. बीएमसीचे आयुक्त तसेच पोलिस आयुक्तांशी चर्चा केली असून रेल्वे प्रशासनाच्या सहकार्यानं आवश्यक ते मदतकार्य करण्याची सूचना ही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत

दररोज हजारो लोक स्टेशनमधून बाहेर पडण्यासाठी या पुलाचा वापर करतात. त्यामुळे या पुलाचं सुरक्षा ऑडिट करण्याची वारंवार  मागणी केली जात होती. परंतु वारंवार मागणी करूनही रेल्वे प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचे बोललं जात आहे.

By mumbaienews.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here