पालघर-योगेश चांदेकर

पालघर- मागील ५० वर्षांपासून अत्यन्त धोकादायक परिस्थितीत प्रवास करत असलेल्या वैतरणा वाढीव बेटावरील रहिवाशांना थोडा दिलासा मिळणार आहे .
काही महिन्यांपासून सातत्याने होणारे अपघात त्यातून होणारे मृत्यू व चालत्या गाडीतून फेकलेले निर्माल्य लागून प्रवाशांना होणाऱ्या गंभीर दुखापती सारख्या अशा सर्व घटना लक्षात घेऊन *डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून* वेळोवेळी रेल्वे व प्रशासनाच्या समोर आणल्या होत्या .

सोबतच ह्या गावातील नागरिकांना होणाऱ्या अपघाला आळा बसावा व उपाय योजना म्हणून पर्यायी रस्ता उपलब्ध करून देण्यासाठी रेल्वे वरिष्ठ अधिकारी, पालघर जिल्हाधिकारी, मेरिटाईम बोर्ड, तसेच स्थानिक व अन्य लोकप्रतिनिधी यांना पत्रव्यवहार करून लवकरात लवकर ह्या गावासाठी रस्ता उपलब्ध होण्याची मागणी लावून धरली होती .

सोबतच ९२,९३ पुलावर होणाऱ्या अपघातांची दखल पालघर जिल्ह्यातील पत्रकार मंडळींनी सुद्धा घेतली होती.
काही दिवसांपुर्वी रेल्वे प्रशासनाकडून वाढीव गावातील सरपंचांना पुलावर सूचना फलक लावून तसेच पुलावरून प्रवास न करण्याचे व सावधानता बाळगण्याचे पत्राद्वारे कळवण्यात आले होते .
ह्याच पत्रामुळे गावात वाढलेल्या चिंतेच्या परिस्थिती वर मार्गदर्शन म्हणून संस्थेच्या पदाधिकार्यांनी वाढीव गावात जाऊन नागरिकांची सभा घेऊन रेल्वे पुलावरून प्रवास करतावेळी घ्यावयाची काळजी व पर्यायी व्यवस्थे विषयी लोकांमध्ये जन जागृती सुद्धा केली होती. संस्थेने सातत्याने ही मागणी लावून धरली होती.
ह्या सर्व परिस्थिती वर विचार करून नागरिकांना व रेल्वे कर्मचारी यांना सोयीस्कर होईल ह्या उद्देशाने रेल्वेने ९२ क्रमांकाच्या पुलावरून एका बाजूने अडीच फुटाचा पादचारी रस्ता बनविण्याचे काम हाती घेतले आहे .
त्या संदर्भात कामाला गती मिळावी म्हणून आज २५/९/२०१९ रोजी रेल्वे पुलाचे इंजिनिअर व कॉन्ट्रॅक्टर यांची भेट घेऊन पुलावर जाऊन संस्थेचे उपाध्यक्ष श्री सतिश गावड , सहसल्लागार श्री सखाराम पाटील व सदस्य महेश हाडळ यांनी होत असलेल्या कामाचा आढावा घेतला .
डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेच्या ह्या प्रयत्नांना यश मिळाले असल्याने स्थानिक गावकऱ्यांना थोडा दिलासा मिळाला आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here