पालघर-योगेश चांदेकर :

पालघर – महाराष्ट्रातील जनतेने दिलेल्या जनादेशाचा अवमान करून, जनतेशी विश्वासघात करून स्थापन झालेल्या राज्य सरकारकडून आता राज्यातील शेतकर्‍यांच्या विश्वासघाताची मालिका प्रारंभ झाली आहे, असा घणाघात विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पालघर येथे बोलताना केला.

6 जिल्ह्यात होत असलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकांसाठी देवेंद्र फडणवीस यांनी आजपासून प्रचाराचा धडाका सुरू केला. पालघरपासून त्यांनी प्रचाराला सुरूवात केली. डहाणू तालुक्यातील कासा येथे कार्यकर्ता मेळावा आणि सभेत ते बोलत होते. विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री रवींद्र चव्हाण, कपिल पाटील आणि इतर नेते यावेळी उपस्थित होते.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनतेने अतिशय योग्य असाच कौल दिला होता. निवडणुकीआधी झालेल्या युतीला त्यांनी स्पष्ट बहुमत दिले होते. त्यामुळे त्यांची काहीच चूक नाही. मी त्यांचे आभार मानण्यासाठी येथे आलो आहे. पण, आमच्या मित्रांनी जनादेशाचा विश्वासघात केला आणि नव्या मित्रांशी घरोबा केला. केला तर ठीक. पण, आता त्यांनी निदान राज्यातील सरकार नीट चालवायला हवे. विश्वासघात हा जसा या सरकारच्या गठनाचा पाया आहे, तसेच आता त्यांनी आपल्या एकेक निर्णयातून जनतेच्या, शेतकर्‍यांच्या विश्वासघाताची मालिका सुरू केली आहे. नव्या कर्जमाफी योजनेतून त्यांनी अवकाळीग्रस्त शेतकर्‍यांना मुद्दाम वगळले. त्यामुळे त्यांना कोणताही लाभ यातून मिळू शकत नाही. आमच्या मासेमार बांधवांना कुठलीही मदत मिळू शकत नाही. ऑक्टोबरमध्ये अवकाळी पावसाने शेतकर्‍यांचे सर्वाधिक नुकसान झाले. पण सप्टेंबर 2019 ची अट टाकल्याने हे शेतकरी मदतीला मुकणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.
विश्वासघात हा ज्या सरकारचा पाया आहे, ते सरकार कधीही फार काळ टिकू शकत नाही, असेही त्यांनी सांगत, जनादेशाचा हा अपमान कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन जनतेला सांगावा, असे आवाहन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here