पालघर: डहाणू तालुक्यात सुरू होणार १० सेमी इंग्रजी शाळा

0
393

पालघर – योगेश चांदेकर:

जिल्हापरिषद शाळांमध्ये सुरु करण्यात आलेल्या डिजिटल क्लासरूम, ई-लर्निंग सुविधा तसेच केंद्र प्रमुख व शिक्षकांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांची गळती रोखण्यात यश आले असून पटसंख्येत देखील सुधार झाला आहे. मागील काही वर्षांत खाजगी सेमी इंग्रजी शाळांची संख्या वाढली असून पालकांचाही सेमी इंग्रजीकडे कल आहे. याचा विचार करून जिल्हापरिषद तर्फे जिल्ह्यात सेमी इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरु करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता.

त्यासंदर्भात पंचायत समिती हॉल डहाणू येथे सभापती स्नेहलता सातवी, उपसभापती पिंटू गहला, शिक्षण खात्याचे अधिकारी आणि केंद्रप्रमुख यांची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये झालेल्या चर्चेतून १२ शाळांच्या निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. निवडलेल्या या १२ शाळांपैकी जिल्हा परिषदेतर्फे १० शाळांमध्ये पुढील शैक्षणिक वर्षात सेमी इंग्रजी सुरु करण्यात येणार आहे.

डहाणू तालुक्यातील दाभोण पिलेनापाडा, कासा, वाघाडी, रणकोल(पाटील पाडा), सारणी(निकने), आशागड, आगवन, सायवन, पिंपळशेत, दाभाडी, टोकेपाडा(चिखला), भराड या शाळांची सेमी इंग्रजी माध्यम सुरु करण्यासाठी निवड करण्यात आली आहे. पंचायत समिती हॉल डहाणू येथे झालेल्या या बैठकीदरम्यान सोशल डिस्टंसीगच्या नियमांचं काटेकोरपणे पालन करण्यात आले होते.

  • “ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना देखील काळाची पावले ओळखून सरकारने सेमी इंग्रजी शिक्षण देण्याचा स्तुत्य निर्णय घेतला आहे. बैठकीत चर्चेद्वारे डहाणू तालुक्यातील संभाव्य १२ शाळांची निवड केली आहे. यातील १० शाळांना जिल्हापरिषद द्वारे मंजुरी देण्यात येणार आहे.” – स्नेहलता सातवी, सभापती डहाणू पंचायत समिती
  • “केंद्र प्रमुख आणि शिक्षकांनी पट संख्या वाढवण्यासाठी अतिशय मेहनत घेतली आहे. नव्याने घेतलेल्या या निर्णयामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना देखील इंग्रजी माध्यमाच्या तोडीचं शिक्षण मिळण्यास मदत होणार आहे. याबरोबरच इतर शाळांमधील शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यावर देखील कायम भर देण्यात येणार आहे.” – पिंटू गहला, उपसभापती डहाणू पंचायत समिती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here