पालघर – योगेश चांदेकर:
लॉक डाऊन जाहीर झाल्यानंतर वाहतूक व्यवस्था बंद झाल्यामुळे अनेक परराज्यातील मजूर हे पायीच मार्गस्थ झाले होते. त्या सर्वांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी असेल त्या ठिकाणी थांबण्यास सांगून सर्व जिल्हाप्रशासनाला परप्रांतीय मजुरांच्या राहण्या-खाण्याची व्यवस्था करण्याचे आदेश दिले होते. त्यावेळी पालघर जिल्ह्यातील खुटल येथे ठेवण्यात आलेल्या उत्तरप्रदेशच्या २३ मजुरांना विशेष रेल्वेने गोरखपूरला पाठवण्यात आले आहे. केंद्रसरकारच्या सूचनांचे पालन करत राज्यसरकारने परराज्यातील मजुरांना घरी परतता यावे यासाठी नियोजन करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनास दिले होते. त्यानुसार आज पालघर जिल्ह्यातील वसई येथून उत्तर प्रदेश येथील गोरखपूरसाठी रात्री ११.३० वाजता एक विशेष रेल्वे सोडण्यात आली आहे. सर्व लोकांना सॅनिटायझर, मास्क, पाण्याच्या बाटल्या तसेच आरोग्य तपासणीचे सर्टिफिकेट देण्यात आले असल्याचे पालघर तालुका आरोग्य अधिकारी अभिजित खंदारे यांनी सांगितले.
दरम्यान देशात १५ एप्रिल रोजी दुसऱ्यांदा लॉक डाऊन वाढवल्यानंतर खुटल येथे ठेवण्यात आलेल्या राजस्थानमधील ८९ जणांनी जेवण सोडले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी कैलास शिंदे यांनी व्यक्तिशः या विषयात लक्ष घालत “कोरोनाचे हे संपूर्ण जगावर आलेलं संकट असून आपण धीर धरायला हवा” असं त्यांना समजावलं होत. तसेच ज्यावेळी लॉक डाऊन शिथिल करण्यात येईल त्यावेळी तत्काळ तुम्हाला सोडण्याच नियोजन करू असा शब्द दिला होता.

उद्या खुटल येथे ठेवण्यात आलेल्या राजस्थानच्या लोकांना एका विशेष रेल्वेद्वारे डहाणू रेल्वे स्थानकातून राजस्थान राज्यातील जयपूर येथे सोडण्यात येणार आहे. सर्वच लोकांची आरोग्य तपासणी करण्यात आली असून त्यानुसार सर्टिफिकेट त्यांना प्रदान करण्यात आले आहे. त्यामुळे तेथील प्रशासनाला नियोजन करणे सोपे जाणार आहे. दरम्यान आज रवाना झालेल्या उत्तरप्रदेशच्या २३ नागरिकांनी लॉक डाऊन काळात केलेल्या उत्तम नियोजनाबद्दल प्रशासनाचे आभार मानले. उपस्थित अधिकाऱ्यांना “कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपली व कुटुंबीयांची काळजी घ्या” असे सांगताना त्यांना गहिवरून आले होते.
“सर्व लोकांना सॅनिटायझर, मास्क, पाण्याच्या बाटल्या तसेच आरोग्य तपासणीचे सर्टिफिकेट देण्यात आले आहेत. त्यामुळे संबंधित राज्यातील स्थानिक प्रशासनाला पुढील निर्णय घेणे सोपे होईल. शनिवारी रात्री उशिरा उत्तरप्रदेशच्या २३ जणांना रवाना केले आहे. उद्या राजस्थानच्या लोकांना विशेष रेल्वेने पाठवण्यात येणार आहे.” – अभिजित खंदारे, तालुका आरोग्य अधिकारी पालघर