हृदय शस्त्रक्रियेमुळे २६ वर्षीय तरूणाला मिळाले नवे आयुष्य

0
332

मुंबई : योगेश चांदेकर-

हृदयाला रक्तपुरवठा करणारी महाधमनीची अँन्युरिझम (अवाजवी वाढ/फुगवटा आलेल्या) मुंबईतील एका २६ वर्षीय तरूणाला व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट शस्त्रक्रियेमुळे नव्याने आयुष्य मिळाले आहे. मीरारोड येथील वोक्हार्ट रूग्णालयात या तरूणावर गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करण्यात आले आहे.

राहुल रामचंद्रन (२६) असे या तरूणाचे नाव आहे. गेल्या सहा महिन्यांपासून या तरूणाला श्वास घेताना त्रास जाणवत होता. स्थानिक डॉक्टरांकडून औषधोपचार सुरू होते. परंतु, प्रकृतीत काहीच फरक पडत नव्हता. अचानक त्रास वाढू लागल्याने त्याला दम लागायला सुरूवात झाली होती. साधारणतः कोरोनाची लक्षण दिसू लागल्याने भितीपायी कुटुंबियांनी त्याला जुलै महिन्यात मीरारोड येथील वोक्हार्ट रूग्णालयात दाखल केले. या ठिकाणी वैद्यकीय चाचण्या केल्या असता तरूणाला हृदयाला रक्तपुरवठा करणारी मोठी धमनी आणि त्याच्याजवळ असलेली झडप निकामी झाल्याचं निदान झालं.

अँओरटिक अँन्युरिझम हा हृदयाच्या आजाराचा एक प्रकार आहे. यात हृदयाकडून अन्य अवयवांना रक्तपुरवठा करणाऱ्या मोठ्या रक्तवाहिनीमध्ये फुगवटा आला होता. मात्र, मीरारोड येथील वोक्हार्ट रूग्णालयातील डॉक्टरांनी तातडीने व्हॉल्व्ह झडप आणि मुख्य रक्तवाहिनी शस्त्रक्रिया करून तरूणाचे प्राण वाचवले आहे.

याबाबत माहिती देताना मीरारोड येथील वोक्हार्ट रूग्णालयातील कार्डिओव्हस्कुलर आणि थोरॅसिक सर्जन डॉ. उपेंद्र भालेराव म्हणाले की, ‘‘हृदयाच्या धमनीचा तीव्र आजार हा तरूणांमध्ये क्वचितच आढळून येतो. हृदयाकडून शरीराला रक्तपुरवठा करणाऱ्या मोठ्या रक्तवाहिनीमध्ये दोष होता. यामुळे शरीरातील अन्य अवयवांना रक्तपुरवठा व्यवस्थित होत नव्हता. यामुळे हृदयाची पम्पिंग क्षमता खूपच कमी झाली होती. अशा परिस्थितीत अनेकदा धमनी फुटल्यामुळे छातीत रक्तस्त्राव झाल्यामुळे अचानक मृत्यू होण्याचा धोका जास्त असतो. हे लक्षात घेऊन तातडीने हृदयावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. वैद्यकीय भाषेत याला एओर्टिक रूट रिप्लेसमेंट सर्जरी असं म्हणतात. ही हृदयविकाराची एक जटिल शस्त्रक्रिया आहे. यात कृत्रिम वाल्व आणि कृत्रिम रक्तवाहिनीद्वारे एओर्टा नावाची रक्तवाहिनी बदलली जाते. या शस्त्रक्रियेत महाधमनीचा आणि झडपेचा भाग काढून टाकण्यात येतो आणि त्याजागी नवीन झडप बसवली जाते. शस्त्रक्रियेनंतर त्याला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले होते. प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्याला आता घरी सोडण्यात आले आहे’’, असेही डॉ. भालेराव म्हणाले.

रूग्ण राहुल रामचंद्रन म्हणाले की, ‘‘हृदयाचा आजार असल्याचे निदान झाल्याने खूप घाबरून गेलो होतो. पण डॉक्टरांनी धीर दिल्याने मनातील भिती दूर झाली. आज फक्त डॉक्टरांच्या प्रयत्नामुळे मला नव्याने आयुष्य मिळाले आहे. मी त्यांचा सदैव आभारी राहीन.’’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here