त्या कोरोना रुग्णाच्या संपर्कात आले होते २९ जण; ४ गावे पूर्ण लॉकडाऊन..!

0
420

पालघर – योगेश चांदेकर:

पालघर तालुक्यातील काटाळे येथील किरण पाटील याच्या वीटभट्टीवर काम करणाऱ्या कामगाराच्या ३ वर्षाच्या मुलीला कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक घटना पुढे आली. सदर दाम्पत्य हे ५ एप्रिल पर्यंत आपल्या मुलीसह काटाळे येथे वास्तव्यास होते. कोरोनाबाधित रुग्णाच्या थेट संपर्कात न येता या चिमुकलीला कोरोना संसर्ग झाल्याने एकच खळबळ माजली आहे.

खोकला, ताप व सर्दीचा त्रास जाणवत असल्याने तिला ५ तारखेला प्राथमिक आरोग्यकेंद्र मासवन येथे दाखवण्यास आणले होते. त्यावेळी त्या दाम्पत्याला मुलीला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यास सांगण्यात आले होते. मात्र त्यानंतर ते मुलीसह डहाणू तालुक्यातील गंजाड दसरा पाडा येथे गेले. ९ एप्रिल रोजी त्या मुलीला उपजिल्हा रुग्णालय डहाणू येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यावेळी मुलीच्या थुंकीचे नमुने चाचणीसाठी पाठविण्यात आले होते.

त्या मुलीच्या संपर्कात आलेल्या डहाणू तालुक्यातील गंजाड दसरा पाडा येथील १६ लोकांना उपजिल्हा रुग्णालय डहाणू येथील विलगीकरण कक्षात दाखल केले आहे. डहाणू पोलिसांनी गंजाड दसरा पाडा व आजूबाजूचे पाडे सील केले आहेत. तर मनोर पोलिसांनी पालघर तालुक्यातील काटाळे, लोहरे, निहे मासवन, वांदिवली हि गावे सील केली आहेत. पालघर तालुक्यातील काटाळे, मासवन या भागातील नर्स व डॉक्टरसह १३ लोक त्या मुलीच्या संपर्कात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

विटभट्टी मालक किरण पाटील याच्याकडे सदर दाम्पत्याच्या वास्तव्याबाबत चौकशी केली असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली. दरम्यान लॉकडाऊन काळामध्ये वीटभट्टीचे कामकाज चालू होते का? अशी शंका व्यक्त केली जात आहे. तसेच वीटभट्टी मालकाने प्रशासनाला चुकीची माहिती दिली का आणि दिली असेल तर त्यामागे काय लपवले तर जात नाही ना असा संशय निर्माण होतो आहे.

  • “कोरोनाबाधित मुलीच्या थेट संपर्कात आलेल्या लोकांबाबत माहिती गोळा करण्याचे काम सुरु आहे. आत्तापर्यंत हायरिस्क संपर्क असणाऱ्या २९ लोकांना विलगीकरण कक्षात दाखल करण्याचे काम सुरु आहे तसेच त्यांचे नमुने कोरोना चाचणीसाठी पाठवण्यात येतील. संबंधित रुग्णाचा प्रवास व वास्तव्य इतिहास पाहून ती गावे सील करण्यात आली आहेत. नेमकी लागण कुठून झाली याचा तपास सुरु आहे.” – अभिजीत खंदारे, तालूका आरोग्य अधिकरी पालघर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here