पालघर: ३० विद्यार्थ्यांसह शिक्षकाला कोरोनाची लागण; प्रशासनाकडून शाळा ‘सील’

0
368

पालघर – योगेश चांदेकर:

पालघजवळील नंडोरे आदिवासी आश्रमशाळेत नववी ते बारावीचे वर्ग सुरू होते. यांतील काही विद्यार्थिनींना कोरोनाची लक्षणे आढळून आल्यानंतर करण्यात आलेल्या चाचणीत नऊ विद्यार्थींनींना कोरोनाची लागण झाल्याचे तपासणीत पुढे आले. त्यानंतर उर्वरित 193 विद्यार्थ्यांची तपासणी केली असता एकूण 30 विद्यार्थ्यांना बाधा झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. विद्यार्थ्यांसह एका शिक्षकालाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वी जव्हार हिरडपाडा आश्रमशाळेतील विद्यार्थी व शिक्षकांना कोरोनाची लागण झाल्यानंतर समोर आलेल्या या घटनेने जिल्ह्यात पुन्हा एकदा भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान विद्यार्थ्यांना व एका शिक्षकाला कोरोनाची लागण झाल्यानंतर स्थानिक प्रशासनाने नंडोरे आश्रमशाळा सील केली आहे.

शाळेत शिकवणाऱ्या एकूण 34 शिक्षकांपैकी एका शिक्षकाला कोरोनाची लागण झाली आहे. तर कोरोनाची सर्वाधिक लागण मुलींना झाली आहे. या आश्रमशाळेतील 24 मुली करोना पॉझिटिव्ह असून सहा मुलांना कोरोनाची बाधा झाली आहे. यातील उपचाराची गरज असणाऱ्या नऊ मुलींना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर, इतर विद्यार्थ्यांना आश्रमशाळेतच विलगिकरण कक्ष स्थापन करून वैद्यकीय टीमच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here