MUMBAI e NEWS:
[पालघर – योगेश चांदेकर]
आदिवासी एकता परिषदेतर्फे पालघर कोळगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय आदिवासी सांस्कृतिक एकता महासम्मेलनास सोमवारी आदिवासी महिला संमेलनाने प्रारंभ करण्यात आला. देशातील विविध राज्यातून आलेल्या महिलांनी वेगवेगळ्या विषयांवर व्यासपीठावरून आपले विचार व्यक्त केले.

या सत्राच्या बीज भाषणात राजस्थानच्या आदिवासी नेत्या साधनबेन मीना यांनी आदिवासी महिलांचे नेतृत्व निर्माण करण्याची गरज झाली असल्याचे सांगून त्यासाठी आदिवासी एकता परिषद कार्य करत असल्याचे सांगितले. महिला संमेलनाच्या अध्यक्षस्थानी केंद्र शासित दादर नगर हवेली प्रदेशातील सामाजिक कार्यकर्त्या पूजा कुंवरा या होत्या.

या संमेलनात शिक्षण व आरोग्य या विषयावर दादर नगर हवेली येथील आदिवासी नेत्या पूनम भागोरिया व झारखंडच्या आदिवासी कार्यकर्त्या श्रेया जेसीकधान यांनी तेथील व्यवस्थेवर मत प्रकट केले, तर विकासाच्या नावाने सर्वच राज्यात नवनवीन प्रकल्प येऊ घातल्याने व प्रकल्प सुरू करण्यात आल्याने त्याचा महिलांच्यावर पडणारा प्रभाव या विषयावर मध्यप्रदेशातील आदिवासी नेत्या शेवंती आर्य व महाराष्ट्रातील निता काटकर यांनी अतिशय मुद्दे सूद व प्रभावी भाषण करत प्रकल्पामुळे कुटुंब व समाजाची होत असलेली तगमग मांडली.

महाराष्ट्रातील नंदुरबार येथील आदिवासी समाजातील नेत्या रेखाताई पाडवी यांनी तसेच मध्यप्रदेशच्या आदिवासी कार्यकर्त्या राधा उमतोल आणि गडचिरोली येथील आदिवासी नेत्या कुसुमताई आलाम यांनी वेगवेगळ्या विषयांवर उपस्थित शेकडो आदिवासी महिलांना यावेळी मार्गदर्शन करून आपले विचार मांडले. या आदिवासी महिला संमेलनाचे सूत्र चालन गुजरातच्या सामाजिक कार्यकर्त्या ऍड सुमित्रा दळवी व मध्यप्रदेशच्या सामाजिक कार्यकर्त्या हेमलता कटरा यांनी केले.

दरम्यान आदिवासी एकता परिषद देशव्यापी वैचारिक आंदोलन चालवत असलेल्या परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, दादर नगर हवेली या राज्यातील चक्रानूक्रमे हे १३, १४ व १५ जानेवारी रोजी महाराष्ट्रातील पालघर येथे आदिवासी सांस्कृतिक एकता महासम्मेलन होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here