पालघर: कोरोनामुक्तीच्या दिशेने आणखी एक पाऊल; टिमा येथील ५ रुग्णांची कोरोनावर मात…

0
352

पालघर – योगेश चांदेकर:

पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील गंजाड दसरा पाडा येथील ३ वर्षीय चिमुकलीच्या संपर्कात आल्याने कोरोनाची लागण झालेल्या वीटभट्टीवरील ५ जणांची (डहाणू तालुक्यातील ४ आणि पालघर तालुक्यातील १ जण) १४ व्या दिवशी व १६ व्या दिवशी घेतलेल्या कोरोना चाचणीचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने आज त्यांना टिमा रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. २६ एप्रिल रोजी त्या ३ वर्षीय चिमुकलीला व शनिवारी टिमा येथील ९ जण आणि डहाणू येथील एका महिलेला कोरोनामुक्त झाल्याने घरी सोडण्यात आले होते. आज आणखी ५ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने जिल्हा आरोग्य प्रशासनाचे सर्वत्र कौतुक होत आहेत. हाय अलर्ट प्रशासनामुळे पालघर जिल्ह्याची तूर्तास वसई तालुका वगळता कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरु आहे.

दरम्यान या पाचही जणांचे १४ व्या दिवशी व १६ व्या दिवशी घेतलेल्या कोरोना चाचणीचे अहवाल निगेटिव्ह आल्याने जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कांचन वानेरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद सूर्यवंशी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना डिस्चार्ज देण्याचा निर्णय घेण्यात आला. आज उत्साहाच्या वातावरणात टिमा रुग्णालयातील कोरोनामुक्त झालेल्या ५ जणांना घरी सोडण्यात आले. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कांचन वानेरे, डहाणू तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदीप गाढेकर, पालघर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिजित खंदारे, टिमा हॉस्पिटलचे प्रभारी इनचार्ज डॉ. मनोज शिंदे यांच्यासह आरोग्य कर्मचारी यावेळी उपस्थित होते. यावेळी त्या पाचही जणांना पुष्पगुच्छ देऊन टाळ्यांच्या गजरात रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here