नाशीक-योगेश चांदेकर :

नाशिक-ठाणे पालघर नाशिक आणि रायगड नंतर आता श्रमजीवी संघटनेच्या वेठबिगार मुक्तीची प्रकाशकिरणं अहमदनगर जिल्ह्यात पोहचली आहेत. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी मधील साकुर फाटा येथील कातकरी समाजाच्या भारती आणि किरण जाधव या दाम्पत्याला नगर जिल्ह्यातील अकोले येथील दत्तात्रेय आणि सुखदेव गीते या मालकांनी वेठबिगार गुलाम बनवून ठेवलेले. श्रमजीवी संघटनेच्या नाशिक जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी मोठ धाडस दाखवत या मजुरांना मुक्तीची पहाट दाखवली, मालकावर अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून मजूरांना मुक्तीचा श्वास घेता आला. श्रमजीवीच्या कार्यकर्त्यांच्या धाडसी संघर्षाचे श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांनी विशेष कौतुक केले.

अकोले तालुक्यातील कोतूळ या ठिकाणी एका तबेल्यात इगतपुरी तालुक्यातील दोन वेठबिगार कामगाराची श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केली सुटका, त्या नंतर त्या मालकावर वेठबिगार प्रतिबंधक कायदा तसेच अट्रोसिटी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यासाठी त्या मजुराला घेऊन कार्यकर्ते अकोले पोलीस ठाण्यात आले मात्र गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांनी तब्बल आठ तास लावले. गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही अशी भूमिका श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घेतली, अखेर गुन्हा दाखल झाला तेव्हा कार्यकर्त्यांनी पोलिस स्टेशन सोडले.

अकोले येथील मालक दत्तात्रेय आणि सुखदेव गीते यांनी तबेल्याच्या कामासाठी भारती आणि किरण जाधव यांना पाच हजार बयाना देऊन बांधून घेतले होते. चार चार हजार पगार देऊन 15 – 18 तास काम करून घेत होते. मध्ये एकदा दहा आणि एकदा वीस हजार रुपये देऊन राबवून घेत होते. दिवाळीच्या सणासाठी हे लोक आपल्या घरी आले आणि भारतीच्या हाताला लोखंडी पत्रा लागल्याने ती काही दिवस घरी थांबली तर मालकाने थैमान घातले, सगळ्या नातेवाईकांना शिवीगाळ आणि यांना मारण्याची धमकी देत मालकांनी त्यांना परत बोलावले. आल्यावर उलट त्यांच्याच अंगावर दीड लाख रुपये आहेत असे सांगत पैसे द्या नाहीतर जाऊन देणार नाही असा दम भरला, भरती बिचारी पैसे जमवा जमव करू लागली तर मालकाने पैसे देत नाही तोवर किरण ला बंधक बनवले. अखेर हा पाशवी गुलामीच्या किस्सा श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांना कळला तेव्हा त्यांनी श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित ,सरचिटणीस विजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली नगर गाठले आणि या मजुरांची मुक्तता करत मालकावर गुन्हा दाखल करण्यात यश मिळवले.

महाराष्ट्र राज्यात नव्हे तर देशात सर्वत्र असे अनेक मजूर गुलाम आहेत। कायदा कागदावर आहे पण शासकीय यंत्रणा आणि पोलीस मात्र याबाबत अजूनही संवेदनशील आणि गंभीर नाहीत हा अनुभव सगळीकडे येतो, समघटना आहे त्याठिकाणी विशेष संघर्ष न करता गुन्हा दाखल होतो मात्र जिथे संघटना नाही तेथे आजही गुलामांना मुक्त करण्यासाठी लढावे लागत आहे अशी खंत पंडित यांनी व्यक्त केली, मात्र माझे कार्यकर्ते आणि माझी संघटना लढत राहणार असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

यावेळी या वेठबिगार मुक्तीच्या संघर्षात भगवान मधे, संतोष ठोबरे, नीता गावंडे, शांताराम भगत, भगवान डोखे, संजय शिंदे, तुकाराम खोडके, काळू निर्गुंडे, सुनिल लोहरे, पिंटू रण, इत्यादी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here