पालघर: ‘त्या’ फरार आरोपीस अटक; पाच दिवसांची पोलीस कोठडी

0
498

पालघर – योगेश चांदेकर:

रिलायन्स गॅस पाईपलाईन बाधित शेतकरी लुबाडणूक प्रकरणातील फरार आरोपी गणेश किसन आडगा याला अटक करण्यात आर्थिक गुन्हे शाखा पालघर यांच्याकडून काल अटक करण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून पोलीसांकडून या प्रकरणातील पाच फरार आरोपींचा शोध सुरु आहे. पोलीसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे माग काढत आरोपी गणेश किसन आडगा याला डहाणू तालुक्यातील चिंचपाडा येथील डोंगरावर अटक केली. आरोपी आडगा हा डोंगरावरील जंगलाचा आधार घेत लपून होता.

गुरुवारी आरोपी आडगा याचा अटकपूर्व जामिनासाठीचा अर्ज पालघर जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला होता. दरम्यान अटकेतील पाच आरोपींच्या समर्थकांकडून आणि फरार आरोपींकडून धमक्या दिल्या जात असल्याची तक्रार बाधित आदिवासी शेतकऱ्यांनी दिली होती. त्यामुळे फरार आरोपींना अटक करण्यासाठी जोरदार शोध मोहीम सुरु केली. फरार पाच आरोपींपैकी एकास अटक करण्यास पोलीसांना शुक्रवारी यश आले. त्यानंतर आज आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असता त्यास २९ जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. निलेश गणपत पाटील, प्रकाश हरसन तांबडा, विनायक दामा कोदे, गोविंद जेठ्या हरपाले हे आरोपी फरार असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.

आर्थिक गुन्हे शाखा पालघरचे पोलीस उपअधीक्षक प्रशांत परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखा पालघरचे पोलीस उपनिरीक्षक प्रताप भोस, पोलीस हवालदार विनय मोरे, पोलीस हवालदार जयंत पाटणकर, पोलीस नाईक राजेश महाजन, पोलीस कॉन्स्टेबल वाल्मिक पाटील सर्व (आर्थिक गुन्हे शाखा पालघर) यांनी आरोपीला अटक करण्यात महत्वपूर्ण कामगिरी बजावली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here