पालघर: गुंगीचे औषध देऊन जनावरे चोरणाऱ्यास अटक; सिद्धवा जायभाये यांच्या पथकाची धडाकेबाज कारवाई..!

0
359

पालघर – योगेश चांदेकर:

डहाणू, बोईसर, चारोटी, कासा या भागातील बेवारस जनावरे उचलणाऱ्या टोळीला कासा पोलीस ठाण्याच्या प्रभारी सिद्धवा जायभाये व सहकाऱ्यांनी अटक केली आहे. गेल्या महिन्या भरापासून या भागातील बेवारस जनावरांना गुंगीचे औषध देऊन गायब करणारी टोळी सक्रिय होती. त्यामुळे या भागातील अनेक जनावरे गायब होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र याचा नेमका तपास लागत नव्हता, त्यामुळे आरोपींचा शोध घेणे मोठे जटील झाले होते. त्यातच स्वतःहून समोर येऊन जनावरे गायब होत असल्याबद्दलच्या तक्रारी देखील कोणी दिल्या नसल्याने सुगावा काढणे कठीण काम होते.

दरम्यान चारोटी येथील हॉटेल परिवार जवळून 18 तारखेला एका बैलास गुंगीचे औषध देऊन स्कॉर्पिओ द्वारे गायब केले होते याची माहिती पोलीस खबरींकडून कासा पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धव्वा जायभाये यांना मिळताच, त्यांनी तपासाची दिशा भिवंडी तालुक्यातील महापोलीकडे वळवली. खबरींनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस हे आरोपी राहत असलेल्या भागात पाळत ठेवून होते. सदर ठिकाणाहून साफळा रचत स्कॉर्पिओसह एकास अटक करण्यात पोलीसांना यश आले आहे. यामध्ये एका आरोपीला अटक करण्यात आली असून इतर तीन आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

अटक करण्यात आलेल्या आरोपीला डहाणू न्यायालयात हजर केले असता 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान बेवारस जनावरांना गायब केल्यानंतर पुढे काय केले जाते? टोळी कशी कार्यरत आहे? तसेच या गुन्ह्यांमध्ये आरोपीचे किती साथीदार आहेत? अशा प्रकारचे इतर किती गुन्हे घडले आहेत? याचा तपास पोलीस घेत आहेत. कासा पोलीस ठाण्याच्या प्रभारी सिद्धवा जायभाये यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय चौधरी, पोलीस नाईक जनाठे, पोलीस नाईक भोई, कॉन्स्टेबल यशवंत पाटील, कॉन्स्टेबल सोनवणे यांनी ही कारवाई केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here