पालघर: कृषी सेवा केंद्रांवर कारवाईचा बडगा; खतांचा काळाबाजार करणाऱ्यांचे दणाणले धाबे

0
314

पालघर – योगेश चांदेकर: जिल्ह्यात युरियासह इतर खतांचा काळा बाजार सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला असून जिल्हयातील २० कृषी सेवा केंद्रांवर कारवाई करण्यात आली आहे. पुढील १५ दिवसांसाठी या दोषी सेवा केंद्रांचा परवाना निलंबित करण्यात आला आहे. परवाना निलंबित करण्यात आलेल्या केंद्रांमध्ये पालघर तालुक्यातील ५ सेवा केंद्रांचा समावेश आहे. बेहिशेबी युरियाच्या विक्री प्रकरणाची बाब गंभीर असून तालुका कृषी कार्यालयामार्फत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांना वाटप करण्यात आलेल्या युरिया खताच्या नोंदी संगणकावर घेण्यात येतात. या नोंदी करण्यासाठी कृषी केंद्रांनी पॉस मशीनचा वापर करून आधार कार्ड लिंक करणे व शेतकऱ्यांना पक्के बिल देणे राज्य सरकारतर्फे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र अनेक कृषी सेवा केंद्रांनी यासाठी पळवाटा शोधल्या आहेत. या सेवा केंद्रांनी एका शेतकऱ्याच्या नावे जास्तीची खत विक्री दाखवून सदर खताचा काळा बाजार केला असल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी कार्यालयाच्या निदर्शनास आले. या प्रकरणात चौकशी करून वाटप करण्यात आलेल्या खताच्या पावत्यांचा मेळही जुळत नसल्याचे दिसून आले. या प्रकरणात पालघर ५, डहाणू ३, वसई ४, वाडा ३, विक्रमगड ४, तलासरी १ अशा सेवा केंद्रांचा परवाना निलंबित करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास जिल्हा कृषी कार्यालयातून करण्यात येणार आहे.

‘स्टिंग ऑपरेशन’..

मुंबई ई न्यूजचे पालघर विभागीय संपादक योगेश चांदेकर हे शेतकऱ्यांच्या हक्काचा युरिया काळ्याबाजारात जाण्यापासून रोखण्यासाठी पाठपुरावा करत आहेत. स्टिंग ऑपरेशनद्वारे युरियाचा काळाबाजार करणाऱ्यांचे पितळ उघडे पाडण्यासाठी गेलेल्या चांदेकर यांना कट रचून मारहाण करण्यात आली. एवढेच नाही तर त्यांच्याविरोधात रीतसर गुन्हा नोंद झालेला नसताना काही जणांनी चारित्र्य हनन करण्याचा कुटील डाव रचला. शेतकऱ्यांच्या न्यायासाठी लढत असणाऱ्या चांदेकर यांच्या मागे खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन पालघरमधील शेतकरीपुत्र सोशल मीडियाद्वारे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here