पालघर: कासा सॅनिटायझर प्रकरणात ग्रामविकास अधिकाऱ्याची भूमिका संशयास्पद..?

0
405

पालघर – योगेश चांदेकर:

पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील कासा ग्रामपंचायत मार्फत ग्रामस्थांना वाटण्यासाठी मागविण्यात आलेल्या 50 रुपये MRP असणाऱ्या हँड सॅनिटायझर बॉटलवर चक्क 190 रुपये MRP चे स्टिकर लावण्यात आले असल्याची एक्सक्लुजीव बातमी मुंबई ई न्यूजने प्रसिद्ध केली होती. केंद्र सरकारने जाहीर केल्याप्रमाणे 200ml हँड सॅनिटायझरची किंमत 100 रुपयांपेक्षा कमी असणे बंधनकारक करण्यात आले असताना पुरवठादाराकडून अशाप्रकाराने जास्तीच्या दराने विक्री होत असल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. त्यानंतर खासदार राजेंद्र गावित यांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र वारभुवन यांच्याकडे केली होती. यासंपूर्ण प्रकरणात कासा ग्रामविकास अधिकारी मोहन पाचलकर यांची एकंदरीत भूमिकाच संशयास्पद आहे अशी शंका निर्माण होते आहे.

मुंबई ई न्यूजचे पालघर विभागीय संपादक योगेश चांदेकर यांनी याबाबत ग्रामविकास अधिकारी मोहन पाचलकर यांना विचारणा केली असता त्यांनी सॅनिटायझर पुरवठा करणाऱ्या बालाजी इंटरप्रायझेस यांनी १९० रु प्रति बॉटलचे कोटेशन दिले असल्याने त्यांचे बिल अदा केले नसल्याचे सांगितले. मात्र ग्रामपंचायत एखादी खरेदी करत असताना त्यासाठी तीन वेगवेगळ्या पुरवठादारांकडून दरपत्रक घेऊन तुलनात्मक रित्या स्वस्त दरात पुरवठा करणाऱ्या व्यक्तीस अथवा संस्थेस खरेदी ऑर्डर देणे बंधनकारक आहे. त्यामुळे दरपत्रकास मंजुरी न देता जर अशाप्रकारे वस्तूंचा पुरवठा केला असेल तर एकूणच प्रकार गैरप्रकारास खतपाणी घालणारे आहे का? असा संशय निर्माण होणारे आहे.

सदर गोष्ट एवढ्यावरच थांबत नाही तर सदर पुरवठादाराने जास्तीच्या एमआरपी चे स्टिकर लावलेला माल मिळाल्यानंतर ग्रामविकास अधिकाऱ्यांना स्वतःला देखील याप्रकरणाची तक्रार करता आली असती, त्यांनी तसे का केले नाही? खासदार गावित यांनी चौकशीची मागणी केलेली असताना तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र वारभुवन यांनी देखील चौकशी केली जाईल असे स्पष्ट केले असल्याने पुरवठादाराने पाठवलेला सॅनिटायझर साठा ग्रामपंचायतने सील करून ठेवणे गरजेचे होते. असे असताना रुपये १९० प्रति बॉटल असा स्टिकर लावलेला साठा पुरवठादाराने २ जुन रोजी परत नेला असल्याची माहिती मिळाली आहे. जिल्ह्यात अशाप्रकारे नफेखोरी करण्यासाठी चढ्या दराने वस्तूंची विक्री करणाऱ्या पुरवठादारांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी खासदार राजेंद्र गावित यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here