…अन्यथा संपूर्ण कुटुंबीयांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार..!

0
432

पालघर – योगेश चांदेकर:

रिलायन्स गॅस पाईपलाईन प्रकल्पबाधित विक्रमगड तालुक्यातील विलशेतमधील अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी मिळालेल्या नुकसानभरपाई लाभातील 30 ते 35 टक्के रक्कम दलालांनी लाटल्याबाबत कार्यकारी दंडाधिकारी विक्रमगड यांच्या कार्यालयात आज प्रतिज्ञापत्र सादर केल्याने या प्रकरणाला आता रंग चढत आहे. मुंबई ई न्यूजचे पालघर विभागीय संपादक योगेश चांदेकर यांनी या प्रकरणाला वाचा फोडल्यानंतर आरोप प्रत्यारोपांच्या अनेक फैरी झडत असताना आजच्या प्रतिज्ञापत्राने अन्याय झालेल्या शेतकऱ्यांनी कथित दलालांविरोधात वज्रमुठ आवळल्याचे स्पष्ट झाले आहे.

रिलायन्स कडून नुकसानभरपाई मिळावी यासाठी गठीत समितीतीलच काही लोकांवर आरोप केले आहेत, सोबतच काही आघाडीच्या माध्यमांच्या प्रतिनिधींचा, पोलीस दलातील काही अधिकाऱ्यांचा यामध्ये सहभाग असल्याचा दावा देखील या शेतकऱ्यांनी केला आहे. याप्रकरणात राजकीय धुरळा उडण्याअगोदरच उच्चस्तरीय सखोल चौकशी व्हावी व सत्य बाहेर यावी यासाठी मुंबई ई न्यूज सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. अन्यायग्रस्तांची एकजूट करण्यात शेतकऱ्यांना यश आल्याने पुढील लढ्याची दिशा ठरवता येणार असल्याचे काही शेतकऱ्यांनी बोलून दाखवले.

दरम्यान भातशेती साठीच्या व इतर जमिनी कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून लागवड योग्य करून देण्यात आलेल्या नाहीत, त्या लवकरात लवकर व्यवस्थित करून देण्यात याव्यात अशी आग्रही मागणी देखील करण्यात आली आहे. जिल्ह्यातील आघाडीच्या माथाडी कामगार नेत्याचे देखील नाव यामध्ये नव्याने आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. शेतकऱ्यांवर झालेल्या अन्यायाची सीआयडी चौकशी करण्यात यावी तसेच हे आरोप खोटे ठरल्यास प्रतिज्ञापत्र दाखल करणारे शेतकरी कारवाईस पत्र असल्याचे देखील नमूद करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रावर प्रशासन काय भूमिका घेते हे पहावे लागणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here