File photo newly born baby

डहाणू प्रतिनिधी – विनायक पवार:
कोरोना महामारीच्या काळात वैद्यकीय सेवेत डॉक्टर, नर्सेस असे अनेक लोक अक्षरशः जिवाची बाजी लावून काम करत आहेत. प्रसंगी अनेकजणांनी कोरोनाच्या विळख्यात अडकल्यानंतर जीव देखील गमावला आहे. इतका धोका असूनही मानवतेवर आलेलं हे संकट दूर करण्यासाठी स्वेच्छेनं डॉक्टर व आरोग्य कर्मचारी काम करत आहेत. एकप्रकारे ते देवदूताचंच काम करत आहेत. मात्र या सर्व गोड अनुभवांना धक्का लागू शकेल असं काम डहाणूतील एका हॉस्पिटलने केल्याचा आरोप होतोय. या हॉस्पिटलने दोन जुळ्यांच्या उपचारासाठी अव्वाच्या सव्वा रक्कम उकळल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे.

डहाणू मध्ये बहुतांशी प्रमाणात आदिवासी समाज असून सरकारी रुग्णालयात अत्याधुनिक यंत्रणा आभावी योग्य पद्धतीचा उपचार मिळत नसल्याने त्यांना खाजगी रुग्णालय शिवाय पर्याय नसतो. अशावेळी त्यांच्या असहाय्यतेचा फायदा घेत खासगी रुग्णालये आदिवासी गोरगरीब जनतेला अक्षरशः लुटण्याचे काम करत आहेत. यावर स्थानिक प्रशासनाचा कोणताही वचक राहिलेला नाही त्यामुळे अशा रुग्णालयांना मोकळं रान मिळत आहे. राजकीय पक्ष, सामाजिक संघटना देखील अशा खाजगी रुग्णालयांवर कारवाईसाठी प्रशासनाकडे दाद मागताना दिसत नाहीत. अशा वेळेस आदिवासी नागरिकांनी करायचे काय असं मोठे आव्हान त्यांच्यासमोर उभे राहिले आहे. हातावर पोट असलेल्या समाजातील प्रवाहात येण्यासाठी धडपडणाऱ्या अशिक्षित लोकांना एका लाखा वर्ती किती शून्य असतात हाच आकडा माहीत नसेल तर त्यांनी दीड लाखाच्यावर उपचाराची रक्कम कुठून भरायची हा एक गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. खासगी रुग्णालयांच्या लुटीने आई जेवू घालेना तर बाप भीक मागू देईना अशा विचित्र अवस्थेत इथला आदिवासी समाज अडकला आहे. आकारण्यात आलेल्या अवाजवी बिलाचा तपशील आणि भरलेल्या बिलाची पोहोचपावती दाखवत त्या हतबल पित्याने आपली कैफियत मुंबई ई न्यूजकडे मांडली. रुग्णालय प्रशासनाकडे संपर्क साधला असता त्यांनी सदर बिलाचे समर्थन केले व बिल कमी केल्याचे सांगितले. जर कमी करून देखील बिल दीड लाखाच्या वरती असेल तर मूळ आकारण्यात आलेली रक्कम किती होती? यावर कुणाचंच नियंत्रण नाही का यामध्ये मनमानी होते? असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतात.

रुग्णांकडून जास्त बिल आकारले जाण्याची जिल्ह्यातील हि पहिली किंवा एकमेव घटना नक्कीच नाही. राजरोसपणे जास्तीची बिलं आकारली जात असताना त्याविरुद्ध कोणतीही कारवाई होत नाही हा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. तक्रार कुणाकडे करायची? दाद कुणाकडे मागायची? अशा प्रश्न पडणारा कुणी एकटाच अन्यायग्रस्त नाही. आदिवासी समाज भोंदू बाबाकडे उपचारास जातो यामागे गरीब अशिक्षित जनतेला लुटणारी रुग्णालये हे देखील कारण असू शकतं का अशी शंका यामुळे निर्माण होते. सरकार आदिवासींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली अनेक योजना आखत व ते राबवत देखील मात्र अशा मूठभर चुकीच्या लोकांमुळे त्या प्रयत्नांना यश मिळत नसावं कदाचित? त्यामुळे जिल्हा प्रशासनाने वारंवार घडणाऱ्या अशाप्रकारच्या घटनांकडे दुर्लक्ष न करता कठोर पावलं उचलणे गरजेचे आहे.

संबंधित रुग्णालयावर कारवाई व्हावी यासाठी मुंबई ई न्यूज पाठपुरावा करणार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here