मुंबई – योगेश चांदेकर
सध्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत स्तरावर जोखीम पत्करून काम करणारे सर्व ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी, मिनी अंगणवाडी कार्यकर्त्या, अंगणवाडी मदतनीस, ‘आशा’ कार्यकर्ती यांना मिळणाऱ्या नियमित वेतन, मानधनाव्यतिरिक्त त्यांना १ हजार रुपये इतकी प्रोत्साहनपर रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
याशिवाय केंद्र शासनाने आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी काढलेल्या ५० लाख रुपयांच्या विम्याच्या धरतीवर या कर्मचाऱ्यांचा ९० दिवसांसाठी २५ लाख रुपयांचा विमा उतरविण्यासही मान्यता देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. यासंदर्भातील परिपत्रक आज निर्गमित करण्यात आले असून सर्व जिल्हा परिषदांना कार्यवाहीसाठी सूचना देण्यात आल्या आहेत.