पालघर : योगेश चांदेकर –

एका खासगी संस्थेच्या नावाचा वापर करून व्यवसाय करण्यासाठी पैसे मिळतील, असे आमिष दाखवून दोन हजार ५८० महिलांकडून सात लाख ७४ हजार रुपये जमा करून फसवणूक केल्याप्रकरणी मनोर पोलिसांनी एकास अटक केली आहे. या आरोपीकडून सर्व महिलांचे आधार कार्ड, दाखले, रेशन कार्ड, बँक पासबुक, खासगी संस्थेच्या नावे बॅनर, बायोमेट्रिक मशिन, लॅपटॉप, दोन मोबाइल फोन जप्त करण्यात आले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विक्रमगड तालुकयातील कुर्झे दगडी पाडा येथे रहाणारा राहुल रामू वाडू मुंबईतील वरळीच्या रिलायन्स फाउंडेशनच्या रुग्णालयात हाऊसकिपींग म्हणून काम करीत होता. राहुलने नोकरीचा राजीनामा देऊन ऑक्टोबर २०१९ पांसून एका खासगी संस्थेच्या नावाखाली पालघर जिल्ह्यात आठ महिला व तीन पुरुष अश्या ११ जणांचा गट तयार केला. या गटामार्फत गणवेश परिधान करून जिल्ह्यातील गावापाड्यांत जाऊन ते प्रचार करू लागले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, नीता अंबानी, मुकेश अंबानी अशा बड्या मंडळींची छायाधित्रे असलेले बॅनर तसेच कंपनी करत असलेली गुंतवणूक, प्रकल्प संदर्भातील माहितीचे बॅनर दाखविले जात होते.

विधवा महिलांना व्यवसायासाठी ४७ हजार रुपये देण्यात येतील, नाव नोंदणी करून ३०० रुपये डीडीसाठी द्या, असा प्रचार करून दोन हजार ५८० महिलांकडून सात लाख ७४ हजार रुपये जमा केले. नावनोंदणी करून सहा महिने उलटूनही या महिलांना व्यवसाय करण्यासाठी कोणतीही मदत न मिळाल्याने पालघर तालुक्यातील गांजे ढेकाले येथील राजश्री तांडेल या महिलेने मनोर पोलिस ठाण्यात तक्रार केली. मनोर पोलिस ठाण्याचे प्रताप दराडे, पोलिस उपनिरीक्षक रिजवाना ककेरी यांनी छडा लावून फसवणूक करणारा राहुल रामू वाडू याला अटक केली. त्याला पालघर न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. अशा प्रकारे फसवणूक झालेल्या महिलांनी मनोर पोलिस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन मनोर पोलिस ठाण्याचे प्रभारी प्रताप दराडे यांनी केले आहे.

“हजारो महिलांकडून सात लाख ७४ हजार रुपये फसवणूक केल्याप्रकरणी एकास अटक केली आहे. आरोपीकडून चौकशी दरम्यान आधार कार्ड, दाखले, रेशन कार्ड, बँक पासबुक, खासगी संस्थेच्या नावे बॅनर, बायोमेट्रिक मशिन, लॅपटॉप अशा विविध वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. पालघर न्यायालयाने आरोपीस पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अशा प्रकारे फसवणूक झालेल्या इतर महिलांनी मनोर पोलीस ठाण्यात संपर्क साधावा.”प्रताप दराडे, साहाय्यक पोलीस निरीक्षक मनोर पोलीस स्टेशन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here